सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
दिवाळीनंतर एक महिन्याच्या सुट्टीनंतर मार्केट यार्डामध्ये पहिल्या बेदाणा सौद्यात किलोला २१५ रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. सौदयासाठी ५० गाड्यांची आवक झाली. सौद्यामध्य सरासरी दर १६० ते २१० रुपये राहिला. अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. यापुढील कालावधीत बेदाण्याची आवक घटणार असून चांगला दर मिळणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी सांगितले.
मागील महिनाभर झिरो पेमेंटमुळे बेदाणा सौदे बंद होते. दिवाळीनंतरच्या पहिल्या सांगलीतील सौद्यामध्ये काय दर होतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. आजच्या बेदाणा सौद्यात तब्बल पाचशे टनाची आवक झाली होती. दुपारी एक वाजल्यापासून सायंकाळी पाच ते सहा वाजे पर्यंत सौदे चालू होते. दिवाळीपूर्वी अवकाळी पाऊस झाल्याने द्राक्ष बागायत क्षेत्रामध्ये फ्लावरिंग व पोंगा स्टेजमध्ये अनेक बागाचे प्रचंड नुकसान झाल्याने बेदाणा दरवाढ होणार हे निश्चित होते.
पप्पू मजलेकर यांच्या दुकानात श्री पद्मन या शेतकऱ्यांच्या ५० बॉक्सला २१५ रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. हा माल नंदी कृष्णा ट्रेडर्स यांनी खरेदी केला. तसेच चांगल्या प्रतीच्या हिरव्या मालास १६० ते २१० तर मध्यम प्रतीचे हिरव्या मालास १२० ते १६० रुपये प्रति किलो भाव मिळाला. काळा बेदाण्याचे दर वाढला असून ७० ते १०० रुपये प्रति किलो दर मिळाला. पहिल्याच बेदाणा सौद्यात सरासरी २० ते २५ रुपये प्रति किलो दर वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.