नवी दिल्ली| संसदेचे अधिवेशन दोन दिवसावर येऊन ठेपले असताना भाजपला राज्यसभेत सभागृहनेता नाही. १४ मे रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घ्यायला सांगितली. तेव्हा पासून आजतागायत देशाचे अर्थमंत्री हंगामी आहेत. तर जेटली यांच्याकडे असणारे राज्यसभेचे सभागृहनेते पद रिक्त आहे.
कॉग्रेस संसदेच्या अधिवेशनात सरकारला घेरण्याची तयारी करत आहे. राज्यसभेत भाजपाचे सभागृह नेते जेटली नसल्याने या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यायची तयारी कॉग्रेसने केली आहे. कारण बुद्धिप्रामाण्यवादी जेटली राज्यसभेत बाजू मांडू लागले की विरोधकांनाही ऐकून घ्यावे लागत असे. भाजपने ही हंगामी सभागृहनेता निवडी साठी हालचाली सुरू केल्या आहेत. विजय गोयल यांची जेष्ठता लक्षात घेता त्यांचे नाव चर्चेत होते परंतु विरोधकांचा प्रहार झेलण्यास ते यशस्वी ठरणार नाहीत म्हणून त्यांच्या जागी विधी मंत्री रविशंकर प्रसाद यांचे नाव चर्चेत आहे. आज रात्री किंवा उद्या दुपार पर्यंत सभागृहनेते म्हणून रविशंकर प्रसाद यांचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.