सिलिगुरी : तुम्ही पाकिस्तानसोबत नेहमी भारताची तुलना करता, भारताचे पंतप्रधान आहात की पाकिस्तानचे ब्रॅण्ड अॅम्बासिडर आहात, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. सिलिगुरी येथे सुधारीत नागरीकत्व कायद्याविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर आणि भाजपवर जोरदार टीका केली.
भारत हा मोठा देश आहे. आपल्या देशाला महान संस्कृती आणि वारसा लाभलेला आहे. मात्र, पंतप्रधान मोदी दरवेळेस आपल्या देशाची तुलना पाकिस्तानसोबत करतात. नक्की, मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत की पाकिस्तानचे ब्रॅण्ड अॅम्बासिडर आहेत असा प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान दरवेळेस कोणत्याही मुद्यात पाकिस्तानसोबत तुलना करत असतात, असा टोलाही ममता यांनी लगावला.




