गुलामगिरी च्या मानसिकतेत असणाऱ्या समाजाचा स्वाभिमान जागृत करून राष्ट्रीय विचारांचा पाया घालणाऱ्या केशव गंगाधर टिळक उर्फ लोकमान्य टिळक यांच्या मयुर डुमने यांचा विशेष लेख.
शिक्षण
महाराष्ट्र आणि देशाच्या जडणघडणीत अमूल्य योगदान देणाऱ्या टिळकांनी निद्रिस्त समाजाला जागे करून भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीचा पाया मजबूत केला. टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे वडील मराठी शाळेत शिक्षक होते. टिळकांच्या आईचे त्यांच्या वयाच्या १० व्या वर्षी तर ते १६ वर्षाचे असताना त्यांच्या वडीलांचे निधन झाले. आई वडिलांच्या निधनानंतर त्यांचा सांभाळ त्यांचे काका गोविंदपंत यांनी केला. १८७३ मध्ये टिळक मॅट्रीक पास झाले. त्यानंतर त्यांनी १८७७ मध्ये गणित या विषयात बी.ए. ची पदवी मिळवली. पुढे त्यांनी एल. एल. बी. ची पदवी देखील मिळवली. आपण घेतलेल्या या शिक्षणाचा उपयोग आपल्या कुटुंबियांसाठी, स्वार्थासाठी करण्याऐवजी देशसेवेसाठी कसा करता येईल असा विचार टिळकांनी केला. त्या काळात डेक्कन कॉलेज मधून बी.ए. झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक, सबजज्ज, मामलेदार अशा नोकऱ्या सहज मिळत असत. अशा काळात सामान्य जनतेला शासकीय नोकरी हेच शिक्षणाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे असे वाटत होते. अशा परिस्थितीत, टिळकांनी देशाची गुलामगिरीतुन सुटका करणारे देशहितकारक शिक्षण देण्याची गरज ओळखली आणि देशसेवेसाठी शिक्षण हा मार्ग निवडला.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना
टिळकांनी आगरकर व चिपळूणकर यांच्यासह 1 जानेवारी १८८० ला पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली. १८८४ मध्ये आगरकर, रानडे, भांडारकर यांच्या साथीने टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. २ जानेवारी १८८५ ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे फर्ग्युसन कॉलेज स्थापन झाले. तेव्हाचे मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन यांनी संस्थेला १२५० रुपयांची देणगी दिल्यामुळे त्यांचे नाव कॉलेजला देण्यात आले. फर्ग्युसन कॉलेज मध्ये टिळकांनी गणित आणि संस्कृत हे दोन्ही विषय शिकविले, नंतर आगरकरांशी झालेल्या मतभेदांमुळे टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेजच्या प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला. अशावेळी अर्थाजनाचा प्रश्न उपस्थित झाल्यावर टिळकांनी लॉ च्या विद्यार्थ्यांचे क्लासेस चालू केले यावरून खाजगी शिकवणी चे जनक असे देखील टिळकांना म्हणता येईल. कायद्याच्या शिक्षणाबरोबर च टिळकांनी राष्ट्रीय शिक्षणाचे धडे या विद्यार्थ्यांना दिले यातून टिळकांचे महाराष्ट्र भरात अनेक समर्थक निर्माण झाले.
आगरकरांसोबत मतभेद
धार्मिक पगडा असलेल्या समाजाला एकत्र करण्यासाठी टिळकांनी १८९३ ला गणेशोत्सवाची आणि १८९५ ला शिवजयंती सुरवात करून सांस्कृतिक राष्ट्रवादाची बीजे पेरली. राष्ट्रजागृतीसाठी शिक्षण हे क्षेत्र अपुरे वाटू लागल्यावर त्यांनी शिक्षणासोबत केसरी आणि मराठा ही दैनिके सुरू केली. १८८१ ते १८८८ दरम्यानच्या काळात टिळक आणि आगरकर यांच्यात राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा आधी यावरून मतभेद झाले. टिळकांचा लढा परकीय सत्तेविरुद्ध होता तर आगरकरांचा लढा स्वकीयांविरुद्ध होता. आधी स्वातंत्र्य मिळवू , सत्ता मिळवू आणि मग सामाजिक सुधारणा वेगाने घडवू असे टिळकांचे मत होते तर सामाजिक सुधारणा झाल्याशिवाय स्वराज्य मिळणं अवघड आहे असे आगरकरांचे मत होते. स्वातंत्र्याच्या मागणीसाठी सर्वांना संघटित करायचे असेल तर त्यांच्यात इतर कोण्या मुद्यावर फूट पडणे व त्यांची शक्ती विभागली जाणे हिताचे नव्हते तत्कालीन रुढीप्रिय समाजाला सामाजिक सुधारणा मान्य नव्हत्या म्हणून टिळकांनी सामाजिक सुधारणांना महत्व दिले नाही.
१८९६ – ९७ साली महाराष्ट्रात प्लेगची साथ आली होती. या प्लेग निवारणाच्या नावाखाली ब्रिटिश सरकारने पुण्यातील नागरिकांना त्रास दिला होता याचा सूड घेण्यासाठी चाफेकर बंधूंनी प्लेग कमिशनर रँड ची हत्या केली. या घटनेनंतर सरकारने जी दडपशाही अवलंबली त्याचा निषेध म्हणून “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?” राज्य करणे म्हणजे सूड उगविणे नव्हे ?” असे ब्रिटिशांवर टीका करणारे अग्रलेख टिळकांनी लिहिले. रँड च्या प्रकरणात टिळकांचाही हात असल्याचे समजून ब्रिटिशांनी टिळकांना १८ महिन्याची शिक्षा दिली. त्या काळी अशाप्रकारे ब्रिटिशांविरुद्ध बोलणे हे मोठे धाडसी कार्य होते सामान्य लोकांमध्येही ब्रिटिशांविषयी खूप असंतोष होता पण त्यांना बोलता येत नव्हते . टिळकांनी या सुप्त असंतोषाला प्रकट रूप दिले म्हणून टिळक लोकमान्य झाले तसेच भारतीय असंतोषाचे जनक म्हणून टिळकांना ओळखले जाते.
१८८९ च्या अधिवेशनात टिळकांनी काँग्रेस अधिवेशनात सहभाग घेतला. १८८५ ते १९०५ या काळात काँग्रेस वर मवाळांचे वर्चस्व होते अगदी सुरवातीच्या काळात टिळकांचाही मवाळांच्या अर्ज विनंत्या या मवाळ मार्गावर विश्वास होता नंतर टिळकांचा विश्वास उडाला. त्यांनी स्वराज ,स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण या चतुःसूत्रीचा वापर राष्ट्रीय चळवळीसाठी केला. १९०५ च्या बंगालच्या फाळणीनंतर चतुःसूत्रीचा हा कार्यक्रम अधिक तीव्र करण्यात आला. १९०५ ला टिळक आणि शिवराम परांजपे यांनी देशातील पहिली परदेशी कापडाची होळी पुण्यात पेटवून दिली. १९०७ मधील सुरत अधिवेशनात जहाल आणि मवाळ गटात संघर्ष होऊन टिळकांना काँग्रेस मधून बाहेर काढण्यात आले. टिळकांच्या या जहाल मार्गाचा ब्रिटिशांनी चांगलाच धसका घेतला होता. ३० एप्रिल १९०८ रोजी प्रफुल्लकुमार चाकी आणि खुदिराम बोस या क्रांतिकारकांनी मुझफफ्फुर येथे न्यायाधीश किंग्जफोर्ड च्या हत्येचा प्रयत्न केला .किंग्जफोर्ड ला मारण्यासाठी त्याच्या बग्गीवर बॉम्ब टाकण्यात आला परंतु तो दुसऱ्याच बग्गीवर पडून त्यात दोन स्त्रिया ठार झाल्या. या घटनेनंतर टिळकांनी केसरीत “देशाचे दुर्देव ” बॉम्बगोळ्याचा खरा अर्थ” असे अग्रलेख लिहून सरकारवर टीका केली. टिळकांची लोकप्रियता वाढत चालली होती आणि टिळकांना काँग्रेस मधून ही काढण्यात आले होते अशा पार्श्वभूमीवर ब्रिटिशांनी, अग्रलेखातील मजकूर राजद्रोह करणारा आहे असे सांगून टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला. राजद्रोहाच्या या दुसऱ्या खटल्यात टिळकांना सहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा झाली. टिळकांना मंडालेच्या तुरुंगात पाठवण्यात आले. या घटनेमुळे पुढील ६ वर्षे जहाल चळवळ थंडावली असली तरी टिळक यांमुळे राष्ट्रीय नेते झाले होते. मंडालेच्या तुरुंगात त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.
१७ जून १९१४ रोजी टिळकांची तुरुंगातून सुटका झाली. १९१५ साली गोपाळ कृष्ण गोखले आणि फिरोज शहा मेहता या मवाळ गटातील प्रमुख नेत्यांचा मृत्यू झाल्यामुळे टिळकांनी पुन्हा काँग्रेसवर वर्चस्व निर्माण केले. अँनी बेझंट यांच्या पुढाकाराने सुरू झालेली होमरूल चळवळ टिळकांनी ही सुरू केली. टिळकांच्या पुढाकाराने १९१६ ला मुस्लिम लीग व काँग्रेस मध्ये लखनौ करार घडून आला. हे सर्व घडत असताना महात्मा गांधीजी भारतात आले होते .चंपारण्यचा लढा (१९१६), अहमदाबाद गिरणी कामगार लढा (१९१७),खेडा सत्याग्रह या लढयांचे यशस्वी नेतृत्व केल्यामुळे गांधींजींचे नेतृत्व निर्माण झाले. १९१६ ते १९१९ अशी सलग तीन वर्षे अन्याय घडो कोठेही तेथे धावून जाणारे आणि निःशस्त्र प्रतिकार करणारे नेते अशी गांधीजींची ओळख निर्माण झाली होती गांधीजींचे हे आंदोलन चालू असताना टिळक मात्र १९१८ मध्ये चिरोल बदनामी खटल्याच्या कामकाजासाठी इंग्लंडला गेले होते. नोव्हेंबर १९१९ मध्ये भारतात परतल्यावर टिळकांनी गांधीजींच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला. ब्रिटिश सत्तेविरुद्ध लिहिल्यामुळे आपल्याला शिक्षा होणार हे माहीत असूनही लोकमान्य परकीय सत्तेविरुद्ध लिहीत राहिले प्रसंगी शिक्षा भोगण्यासही सज्ज झाले हा टिळकांचा मार्ग गांधीजींच्या सविनय कायदेभंगाशी साधर्म्य साधणारा आहे. टिळकांनी पायाभरणी केलेल्या स्वातंत्र्य चळवळीचे पुढे गांधीजींनी यशस्वी नेतृत्व करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले .
१ ऑगस्ट १९२० च्या पहाटे मुंबईच्या “सरदारगृह ” येथे लोकमान्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि भारताच्या राजकीय इतिहासातील एक पर्व संपले .लोकमान्यांच्या निधनाने राष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्राचे नेतृत्व संपुष्टात आले. काळ जसा समजून घ्यावा लागतो तसेच त्या काळाला कलाटणी देणारी माणसेही समजून घेणे गरजेचे असते. लोकमान्य टिळकांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
मयुर डुमने
(लेखक राज्यशास्त्राचे अभ्यासक असून रानडे इन्स्टिट्युट, पुणे येथे पत्रकारितेचे शिक्षण घेत आहेत)