पुणे | मयूर डुमणे
मतभेद असणं हे माणसाच्या जिवंतपणाच लक्षण आहे. आपल्याला एकसुरी समाज घडवायचा नाही. एक देश, एक भाषा, एक धर्म ही संस्कृती देशामध्ये अराजकता निर्माण करते. आपण बहुविविधतेचे हजारो वर्षे पालन करत आलो आहोत. ही विविधता जोपासण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे, असं मत उस्मानाबाद येथे होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केले. संमेलनाध्यक्ष पदी निवड झाल्यानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेने त्यांचा सत्कार केला.
दिब्रिटो म्हणाले की, मुद्याला मुद्याने उत्तर द्या, गुद्याने नाही. ज्या देशातील लोक ऐकमेकांचा द्वेष करतात त्या देशाला भविष्य चांगलं नसतं. सीमेबाहेरच्या शत्रूपेक्षा मला घरातल्या शत्रूची अधिक चिंता वाटते. प्रत्येक माणसाला जगण्याचा हक्क आहे. ‘अहिंसा परमो धर्म’ ही आपली संस्कृती आहे. झुंडशाहीने केलेला हिंसाचार आपल्याला मान्य आहे का? चांगली माणसं याविरुद्ध बोलत नाहीत.जिथे जिथे हुकूमशहाचा उदय होतो तिथे तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने लादली जातात.
समाजाच्या हरवलेल्या विवेकातून झुंडशाही जन्माला येते. ही झुंडशाहीच आजच्या लोकशाहीपुढील सर्वात मोठे आव्हान आहे. साहित्यातून निर्माण होणारा विवेक हेच या झुंडशाहीला प्रत्युत्तर आहे, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, संमेलनाचे अध्यक्षपद निवडले गेल्यानंतर समाजातून ज्या पद्धतीने विचारकलह निर्माण होतोय ते पाहिल्यानंतर आमची भाषा इतकी हीन दर्जाची कशी काय झाली हा प्रश्न निर्माण होतो. भाषा ही संस्कृतीचे निदर्शक असते. आणि भाषेतून तुमचे सांस्कृतिक अधःपतन प्रत्ययाला येते. त्यामुळे भाषेचा वापर करण्याची विवेकबुद्धी समाजाला मिळणे गरजेचे आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी लेखकाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणे हे साहित्य संस्थांच काम आहे, हे काम महाराष्ट्र साहित्य परिषद ठामपणे निभावत आहे.
प्रा. जोशी पुढे म्हणतात की, रूळ बदलला तर खडखडाट हा होणारच पण तो खडखडाट समाजाला सहन करावा लागेल कारण तरच समाजपरिवर्तनाची पाऊले पडू शकतील. साहित्य संमेलन हा मराठी समाजाचा वाङमयीन उत्सव आहे. संमेलनाचे अध्यक्ष हे मराठी समाजाच वैचारिक नेतृत्व करतात. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे धर्म, जात, पंथ या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन सर्वांना एकत्र आणणार व्यासपीठ आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी अथवा पुढारलेला आहे, अशी अफवा मी माझ्या लहानपणापासून ऐकत आलो आहे. या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणायच का या प्रश्नाचं गांभीर्याने चिंतन आपल्याला करावं लागणार आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे म्हणाले की, मराठी विचारपीठ हे एका डबक्यासारखं झालं होतं. त्याला खळखळती वाहणारी नदी बनवण्याचं काम महाराष्ट्र साहित्य परिषदेने केलं आहे. आता ही नदी वाहताना काही दगड धोंडे आडवे येणारच. या दगडधोंड्यांची परवा न करता ही नदी त्यांना पोटात घेऊन पुढे जात आहे. संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषद, प्रा.मिलिंद जोशी, साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांना धमक्यांचे फोन कॉल आले होते. यामुळे हा सत्काराचा कार्यक्रम पोलिस बंदोबस्तात घ्यावा लागला.