मधुकर पिचड यांना बळ देणाऱ्या भाजपला धनगर समाज माफ करणार नाही – विक्रम ढोणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली : धनगर आरक्षणात सातत्याने ‘व्हिलन’ची भुमिका बजावलेले राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांना भाजपने पावन करून ‘हिरो’ बनवले. हा धनगर समाजाचा विश्वासघात आहे, त्यामुळे समाज भाजपला माफ करणार नाही, असा इशारा धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी दिला आहे.

यासंबंधाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात ढोणे यांनी म्हटले आहे की, मधुकर पिचड हे सातत्याने सत्तेत राहिले आहेत. धनगर आरक्षणाच्यादृष्टीने नकारात्मक कागदपत्रे त्यांच्याच आदिवासी मंत्रीपदाच्या काळात बनवली गेली आहेत. त्यांनी सातत्याने धनगर आरक्षणाच्या विरोधी टोकाची भुमिका घेतली आहे. गेल्या 5 वर्षात धनगर आरक्षणाचा मुद्दा आला की सरकारला इशारे देण्यात तेच पुढे होते. धनगरांना एसटी आरक्षण दिले तर मुंबईचा पाणीपुरवठा तोडण्याची धमकी दिली होती. आदिवासी तरूणांना नक्षलवादी बनवायला भाग पाडू नका, असा इशाराही त्यांनी दिला होता. मधुकर पिचड यांच्याविषय़ी धनगर समाजात असलेला प्रचंड रोष वेळोवेळी रस्त्यावर प्रगट झालेला आहे. धनगर समाजाप्रमाणे महादेव कोळी समाजालाही पिचड यांनी विरोध केलेला आहे.

मूळ आदिवासींच्या म्हणण्यानुसार स्वत: मधुकर पिचड हे बोगस आदिवासी आहेत. त्यासंबंधाने न्यायालयीन प्रक्रियाही सुरू आहे. शिवाय पिचड यांनी आपल्या दुसऱ्या पत्नीला आदिवासीचा बोगस दाखला काढून दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यासंबंधीने नगर जिल्ह्यातील अकोले येथे तीन दिवसांपुर्वी मोठे आंदोलन झाले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईत मधुकर पिचड यांचा वाजतगाजत भाजपप्रवेश झाला. या कार्यक्रमात स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी पिचडांची स्तुती केली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर मधुकर पिचड हे सज्जन आहेत, आदर्श आहेत, असे सांगितले. फडणवीस सरकार हे आता पिचडांचे मार्गदर्शन घेवून चालणार आहे. हा प्रकार धनगर समाजाच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. तसेच धनगरांना एसटी आरक्षण मिळणार नाही, असे स्पष्टपणे सांगणारा आहे. धनगरांना एसटी आरक्षण देणार नाही, याची स्पष्ट खात्री देवूनच भाजपने पिचडांचा प्रवेश घडविलेला आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीवर टीका करताना धनगर समाजाला हक्कापासून वंचित ठेवल्याचा आरोप केला होता. या टिकेसंबंधीची कागदपत्रे मधुकर पिचड यांच्या पुढाकाराने बनवली गेली आहेत. हे सर्वांना माहिती असताना त्यांना ‘हिरो’ करण्याचा प्रकार हा धनगर समाजाच्या पाठीत खंजिर खुपसण्याचा प्रकार आहे, असेही ढोणे यांनी म्हटले आहे.