मनाबरोबरच वसुंधरेलाही समृद्ध करा-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | केवळ एका दिवसापुरता योग अभ्यास न करता त्यात सातत्य ठेवावे. ज्याप्रमाणे योग अभ्यास मनाला समृद्ध करतो. त्याप्रमाणेच नागरिकांनी वसुंधरेला देखील समृद्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा. स्वच्छता राखण्याबरोबरच वृक्ष संरक्षण, संवर्धन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी सकाळी शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि विविध योग संस्थेच्यावतीने योग दिनाचे विभागीय क्रीडा संकुलात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले.

याकार्यक्रमास खासदार डॉ.भागवत कराड, आमदार अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, ब्रिगेडियर एम.एम. विटेकर, कर्नल एम.रवी कुमार, लेफ्टनंट कर्नल विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, क्रीडा उपसंचालक उर्मिला मोराळे, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, योग गुरू सुभाष वेद पाठक, किशोर शितोळे, मिस इंडिया रनर अप शरण रॉड्रिग्स, गायिका श्रावणी महाजन, तालुका क्रीडा अधिकारी शरद कचरे, तांदळे, सचिन पुरी आदींसह जिल्ह्यातील योगप्रेमी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्त्व देशाला पटवून दिले आहे. जीवनशैली समृद्ध करण्यात योगाचे महत्त्व आहे. योग अभ्यासाबरोबरच वसुंधरेला समृद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आग्रही आहेत. योग करण्याबरोबरच वसुंधरेच्या संरक्षणासाठी सर्वांनी स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. परिसर स्वच्छ ठेवावा. झाडांची निगा राखावी, वसुंधरेच्या संरक्षणासह संवर्धनाची जबाबदारी नागरिकांनी पार पाडावी, असेही चव्हाण यावेळी म्हणाले. प्रशिक्षक पाठक व चमूने ताडासन, पादहस्तासन, अर्ध चक्रासन, त्रिकोणासन, दंडासन, भद्रासन आदींसह उभे राहून, बसून, पोटावरील, पाठीवरील योगासने, विविध प्रकारचे प्राणायाम करत उपस्थ‍ितांचा योग अभ्यास वर्ग घेतला. योग अभ्यासाचा शेवट प्रार्थना आणि संकल्प करत, शांती पठनाने झाला. तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Leave a Comment