मला फक्त अर्थव्यवस्थेची चिंता – चिदंबरम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था | आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सरकारला टोमणा मारला आहे. त्यांना पोलीस संरक्षणात तिहार तुरुंगात नेण्यात येत असताना मला फक्त अर्थव्यवस्थेची चिंता वाटते असे चिदंबरम म्हणाले. आयएनएक्स मीडिया प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काही म्हणायचे आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावेळी त्यांनी मला फक्त अर्थव्यवस्थेची चिंता आहे असे उत्तर दिले. आयएनएक्स मीडिया प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने गुरुवारी चिदंबरम यांची तिहार तुरुंगात रवानगी केली.

विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांनी चिदंबरम यांना १४ दिवसांची १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चिदंबरम यांची १५ दिवसांची सीबीआय कोठडी संपल्यानंतर त्यांना दिल्लीच्या रोझ अव्हेन्यू कोर्टासमोर हजर करण्यात आले.सुनावणीदरम्यान, सीबीआयने चिदंबरम यांना तुरुंगात पाठवण्याची मागणी केली होती. सरकारी वकिलांनी म्हटले की, जामिनावर सुटल्यानंतर ते साक्षीदारांवर दबाव आणू शकतात. कारण ते एक ताकदवान नेते आहेत त्यामुळे त्यांची जामिनावर सुटका करण्यात येऊ नये. तर चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीला विरोध करताना म्हटले की, चौकशीदरम्यान दबाव टाकणे किंवा त्यामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण करण्याचा कोणताही आरोप चिदंबरम यांच्यावर नाही, त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात येऊ नये. तसेच चिदंबरम या प्रकरणात ईडीच्या कोठडीत जाण्यासाठी तयार असल्याचेही यावेळी सिब्बल यांनी कोर्टाला सांगितले. मात्र, कोर्टाने चिदंबरम यांची ही मागणी फेटाळून लावली.

Leave a Comment