हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईत आज महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदारांची बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्राचे प्रश्न केंद्रात मांडण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती खासदार शरद पवारांनी दिली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री जयंत पाटील, मंत्री सुभाष देसाई यांच्यासह इतर मंत्री आणि महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदार उपस्थित होते.
दिल्लीमध्ये आपले प्रश्न मांडण्यासाठी आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू ही राज्ये एकत्र येतात. आपण देखील येण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राचे प्रश्न केंद्रात मांडण्यासाठी एक समिती करावी अशी सूचना आज खासदारांच्या एकत्रित बैठकीत मान्य झाली, अशी माहिती शरद पवारांनी दिली. पवार म्हणाले, या समितीचा एक समन्वयक नेमून त्याला दिल्लीमध्ये कार्यभार चालवण्यासाठी एखादे कार्यालय द्यावे. सचिवालयातूनही या समन्वयकाला पूरक सहाय्य मिळावे व महाराष्ट्र सदनमध्ये या संयोजनाची व्यवस्था करता येईल.
पंजाब महाराष्ट्र बँकेच्या शाखा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत वर्ग कराव्यात, अशी सूचना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांच्या बैठकीत केली. या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या आर्थिक प्रश्नी मला आशा आहे की ठेवीदारांवरील संकटातून मार्ग निघू शकेल.