विशेष प्रतिनिधी | शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मनात काय आहे हे ठामपणे सांगत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी झगडणाऱ्या भाजप आणि शिवसेना पक्षामध्ये सरकार स्थापन करण्याबाबत एकमत होत नाहीये. अमित शहा यांनी या प्रकरणात लक्ष घालणं टाळलं असताना, मोदींनी दुर्लक्ष केलेलं असताना शिवसेनेची बाजू उचलून धरण्याचं काम संजय राऊत यांनी चोखपणाने बजावलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी ना देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला ना राज्यातील भाजपच्या कुठल्या वरिष्ठ नेत्याने.
सरकार स्थापन करण्यात अडचणी येत असल्यामुळे भाजप पूर्णतः गोंधळलेल्या स्थितीत असून राष्ट्रपती राजवट लागू करून काळजीवाहू मुख्यमंत्रीपद सांभाळण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा हेतू असल्याचं आता स्पष्ट होत आहे.
आज देवेंद्र फडणवीस सरकारचा कार्यकाळ पूर्ण होत असताना सत्तास्थापन करायची असेल तर शेवटचं अस्त्र म्हणून भाजपने नितीन गडकरी यांना उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पाठवलं आहे. शुक्रवारी सकाळी उद्धव ठाकरेंची भेट नितीन गडकरी घेणार असून ते तरी शिवसेनेची मनधरणी करणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मनमानी आणि हेकेखोर स्वभावाला शिवसेना भीक घालत नसली तर नितीन गडकरींचा पर्याय शिवसेनेला चालणार आहे का? आणि अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर मार्ग निघणार का? हे ठाकरे आणि गडकरी यांच्या भेटीनंतरच स्पष्ट होईल.