सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आणलेल्या महिलेचा तिच्या गर्भात असणाऱ्या बाळासह मृत्यू झाल्याची घटना आज घडली. श्रीदेवी उत्तम नरळे असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. डॉक्टरांनी महिलेवर वेळीच उपचार न करता तिची प्रसूती केली नसल्याने अर्भक आणि मातेचा मृत्यू झाल्याचा आरोप संबंधित महिलेच्या कुटुंबीयांनी करत संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर कारवाई करावी या मागणीसाठी रुग्णालयाच्या बाहेरच गोंधळ घालत ठिय्या मारला होता.
हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा यावेळी नातेवाईकांनी घेतला. राम नगर मध्ये राहणाऱ्या श्रीदेवी नरळे यांना तिसऱ्या अपत्याच्या प्रसूतीसाठी काल दुपारी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टरांनी श्रीदेवी यांच्या सर्व चाचण्या करून घेण्यात आल्या. यामध्ये महिलेची नैसर्गिक प्रसूती होईल, असे सांगण्यात आले होते. येथील प्रसूतिगृहात बेड शिल्लक नसल्याने त्यांना ताटकळत ठेवण्यात आले. मात्र, रात्री 8 वाजल्यानंतर महिलेची प्रकृती अचानक बिघडली. त्यावेळी डॉक्टरांनी बाळाच्या छातीचे ठोके वाढल्याने बाळासह आईच्या जीवालाही धोका होईल, असे सांगितले. मात्र, अचानक रात्री दोनच्या सुमारास महिला आणि नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
त्यामुळे संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी गरोदर महिलेचे सिजर द्वारे प्रसूती करून तिचा जीव वाचवण्याची डॉक्टरांकडे विनंती केली. मात्र डॉक्टरांनी त्यांना तुमच्या आधी दोन सिझरिंगचे पेशंट आहेत तुम्हाला थांबावे लागेल असे सांगितले, काही काळ केल्यानंतर महिलेची प्रकृती अधिकच खालावल्याने निदर्शनास येताच डॉक्टरांनी तिला अतिदक्षता विभागात दाखल केले. त्यानंतर तब्बल एक तासानंतर बाळासह महिलेचा मृत्यू झाल्याचे कुटुंबियांना सांगण्यात आले. महिलेसोबत असणाऱ्या कुटुंबीयांनी याची माहिती नातेवाईकांना दिल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात एकच गर्दी केली.
उपचारादरम्यान डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाल्याने महिलेचा आणि बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला. सकाळी संतप्त नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांवर कारवाईच्या मागणीसाठी रुग्णालयाच्या समोर ठिय्या आंदोलन केले. यामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते