मुंबई । शिवसेनेचे नेते, राज्याचे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचं रविवारी रात्री निधन झालं. त्या ७५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या मागे पती, मुलगा, सून कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
अनघा जोशी गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. काल रात्री ११ वाजता दादर शिवाजी पार्क येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. अनघा जोशी यांचा जन्म २ जानेवारी १९४५ रोजी झाला होता. अनघा जोशी यांचं माहेरचं नाव मंगल हिगवे होतं. १४ मे १९६४ रोजी त्यांचा मनोहर जोशी यांच्याशी विवाह झाला होता. मनोहर जोशी यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील यशात अनघा जोशी यांनी त्यांना मोलाची साथ दिली.
लग्नानंतर मनोहर जोशी राजकारणात सक्रिय झाले. शिवसेने सारख्या जहाल संघटनेत जोशी यांनी काम सुरू केल्यानंतरही अनघा जोशी या मनोहर जोशी यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यातील चढ-उतार आणि यश-अपयशाच्या काळातही त्यांनी जोशी यांना खंबीर साथ दिली. मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य या मनोहर जोशी यांच्या राजकीय प्रवासात अनघा यांनी त्यांना मोलाची साथ दिली.