महाविकास आघाडी सरकार मधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात कोरोनाची महामारीने थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशावेळी सामान्य नागरिकांबरोबर लोकप्रतिनिधी सुद्धा कोरोनाच्या कचाट्यात सापडत आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड अशोक चव्हाण आणि धनंजय मुंडे यांच्या पाठोपाठ राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईचे पालकमंत्री देखील असणारे अस्लम शेख यांनी ट्विट करत आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती दिली आहे. अस्लम शेख यांनी यावेळी आपल्यामध्ये कोरोनाची लक्षणं जाणवत नसून होम क्वॉरंटाइन केलं असल्याची माहिती दिली आहे. तसंच आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची चाचणी करण्याची विनंती केली आहे.

अस्लम शेख यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “मला करोनाचा संसर्ग झाला आहे. माझ्यामध्ये सध्या करोनाची कोणती लक्षणं नसून, स्वत:चं विलगीकरण केलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी करोनाची चाचणी कऱण्याची विनंती करतो. मी घरातून काम करत राज्यातील लोकांची सेवा करण्याचं काम सुरु ठेवणार आहे”.

यापूर्वी ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण आणि धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून बरे होऊन हे तिन्ही मंत्री पुन्हा कामाला लागले आहेत. तर जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याने गडाख होम क्वॉरंटाइन झालेले आहेत. मुंबईचे पालकमंत्री देखील असणारे अस्लम शेख यांनाही कोरोनासारखी लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी कोविड चाचणी केली असता त्यांना करोनाची सौम्य लक्षणे असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे त्यांनी होम क्वॉरंटाइन होण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, काल मुंबईत ६४ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण करोना मृतांची संख्या ५ हजार ७११ इतकी झाली आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आणखी वाढून सरासरी ५५ दिवसांवर पोहोचला. तर रुग्णवाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन १.२६ टक्के झाला आहे. समाधानकारक बाब म्हणजे, काल मुंबईतील १ हजार १९३ रुग्णांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यामुळं एकूण ७१ हजार ६८५ रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी परतले आहेत. त्यामुळं रुग्णांचा रिकव्हरी रेट ७० टक्के आहे. तर एकूण २३ हजार ८२८ रुग्ण सध्या विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment