वृत्तसंस्था| लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावं लागल्यामुळे काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी माजी खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांची वर्णी लावण्यात आली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय समितीने एकनाथ गायकवाड यांची काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे.लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचे राजीनामे दिले होते.
त्यामुळे त्यामुळे काँग्रेस हायकमांडने काँग्रसेच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती केली होती. तर मुंबईच्या कार्यकारी अध्यक्षपदी एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती केली होती. लोकसभा निवडणुकीनंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्तच होते. अखेर आज हे पद भरण्यात आलं असून एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात गणेश विसर्जनानंतर लोकसभा निवडणुका लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत दलित व्होट बँक डोळ्यासमोर ठेवूनच गायकवाड यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. गायकवाड पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. शिवाय त्यांचे पक्षातील सर्वच नेत्यांसोबत चांगले संबंध असल्याने मुंबईत त्यांच्या नेतृत्वाचा काँग्रेसला फायदाच होईल, असं पक्षाचे म्हणणे आहे.