पुणे : एम.आय.टी. संस्था प्रशासनाने विद्यार्थी आणि पालकांसाठी अजब आचारसंहिता लागू केली आहे. संस्थेने घालून दिलेले जगावेगळे नियम वाचल्यानंतर आपण भारतात आहोत की तालिबानमध्ये असा प्रश्न आचारसंहिता वाचणार्याला पडतो आहे. या नियमावलीत एका पेक्षा एक सरस नियम लागू करून विद्यार्थी आणि पालकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न महाविद्यालय प्रशासनाने केला आहे.
”मुलींनी पांढरी किंवा क्रीम रंगाची अंतर्वस्त्रे घालावीत.” हा पहिला नियम. यातून त्यांना काय साध्य करायचे आहे हे त्यांनाच माहीत. मुलींनी लिपस्टिक/लिपबाम लावून शाळेत यायचे नाही. कानातील आभूषणे सोडून कोणतीच आभूषणे परिधान करायची नाहीत. असे अनेक नियम आचारसंहीतेत नमुद केले आहेत. यामुळे महाविद्यालयातील मुलींच्या स्वातंत्र्यावरच गदा आली आहे.
मुलांनी कोणत्याच राजकीय सामाजिक धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हायचे नाही. विद्यार्थी जर दहा वेळा इंग्रजी व्यतिरिक्त अन्य भाषेत बोलताना आढळला तर त्याचा प्रवेश रद्द केला जाणार. या अशा नियमांमुळे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आले आहेत. आचारसंहितेतील कोणत्याही नियमाचा भंग अथवा शाळेच्या विरोधात आंदोलन केल्यास त्या विद्यार्थ्याच्या पालकांवर फौजदारी खटला भरला जाईल असेही नियमावलीत म्हणले आहे.
विद्येचे माहेरघर म्हणुन ओळख असलेल्या पुण्यामधे अशा प्रकारचा फतवा निघाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विविध विद्यार्थी संघटना एम.आय.टी. प्रशासनाच्या या तालिबानी फतव्याचा विरोधात आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत.