मुंबई : खातेवाटपाची चर्चा अजूनही सुरू असताना शिवसेनेला पहिला धक्का बसला आहे. कॉंग्रेसमधून शिवसेनेत आलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेटऐवजी पदरी पडलेलं राज्यमंत्रिपद आणि औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदावरुन अब्दुल सत्तार गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर नाराज होते. या नाराजीतूनच सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. सत्तार यांची समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे प्रयत्नही निष्फळ ठरल्याचं चित्र आहे.
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसची साथ सोडून अब्दुल सत्तार शिवसेनेत आले होते. सत्तार यांनी औरंगाबादमधील सिल्लोड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. ठाकरे मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची आशा असलेल्या सत्तार यांची राज्यमंत्रिपदावर बोळवण झाल्याने ते नाराज होते.