चंदेरी दुनिया । बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार बऱ्याचदा नागरिकत्वाच्या मुद्यावरून ट्रोलर्स निशाण्यावर येतो. देशभक्तीवर आधारीत चित्रपट करणाऱ्या अक्षय कुमारवर कॅनडाचा नागरिक असल्याच्या मुद्यावर बरेचजण टीका करतात. खुद्द अक्षय कुमारने कॅनडाचे नागरिकत्व का स्वीकारले याचा खुलासा केला आहे. त्याशिवाय, आपण आता भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला असल्याची माहिती त्याने दिली.दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात अक्षय कुमारने ही माहिती दिली. आपल्याला लवकरच भारतीय पासपोर्ट मिळणार असल्याचे त्याने सांगितले. या कार्यक्रमात अक्षय कुमारने सांगितले की, काही परिस्थितीमध्ये मला कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारावे लागले होते.
माझे सलग १४ चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यामुळे आपली कारकीर्द संपली असून आता आयुष्य जगण्यासाठी आणखी काही वेगळी कामे करावी लागणार असल्याचे वाटत होते. माझा एक जवळचा मित्र कॅनडात राहतो. त्यानेच मला कॅनडात येण्यास सांगितले. आपण इथं काही व्यवसाय करू असे त्याने सांगितले. त्यानंतर मी कॅनडाचा पासपोर्ट स्वीकारला.
माझं बॉलिवूडमधील करिअर संपले असे वाटल्यामुळे मी तो निर्णय घेतला असल्याचे अक्षय कुमारने सांगितले. सुदैवाने माझ्या १५ व्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्यानंतर मी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर पासपोर्ट बदलण्याबाबत विचार केला नसल्याचे अक्षयने सांगितले.