नवी दिल्ली | शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. रिझवी यांनी चंद्र आणि चांदणी असलेल्या झेंड्यावर बंदी घालावी असा दावा दाखल खटल्यातून केला आहे. कारण या झेंड्याचा आणि इस्लाम धर्माचा काहीच संबंध नाही असे रिझवी यांनी कोर्टात सांगितले आहे. सरकारशी सल्ला मसलत करून सरकारची बाजू न्यायालयात मांडावी असे निर्देश सरकारी वकील तुषार मेहता यांना न्यायमूर्ती ए के सिकरी यांच्या अध्यक्षतेखाली बनलेल्या खंडपीठाने दिले आहेत.
प्रेशीत मुहम्मद पैगंबर जेव्हा मक्केला गेले तेव्हा त्यांच्या हातात पांढरा ध्वज होता. मधल्या काळात मुस्लीम सैन्याचे अनेक रंगाचे झेंडे अस्तित्वात आले परंतु चांदणी चंद्र असलेल्या हिरव्या झेंड्याचे अस्तित्व १९०६ पर्यंत नव्हते असा दावा रिझवी यांच्या कडून करण्यात आला आहे. १९०६ साली मुस्लिम लीगने या ध्वजाची निर्मिती केली.
मुस्लिम वस्त्यात घरावर हा झेंडा लावला जातो त्यामुळे हिंदू लोक या झेंड्याला पाकिस्तानचा झेंडा समजतात आणि दोन्ही धर्मात शत्रुत्वाची भावना वाढीस लागते म्हणून या झेंड्यावर बंदी घालण्यात यावी असे रिझवी यांनी न्यायालयात म्हणले आहे.