अभिमानास्पद! युरोपच्या सर्वोच्च शिखरावर मराठी माणसाने फडकला 73 फुटी तिरंगा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मॉस्को(रशिया) | 360 एक्सप्लोरर मार्फत एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्यासोबत सह्याद्रीच्या मावळ्यांनी अफलातून विश्वविक्रम आपल्या नावावर केला. भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 73 फुटी तिरंगा युरोपातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एलब्रुसच्या बेसकॅम्पवर त्यांनी फडकवला. आनंद बनसोडे यांच्या मोहिमेत 10 वर्षाचा साई कवडे, तुषार पवार, भूषण वेताळ, सागर नलावडे आनंद बनसोडे यांचा समावेश आहे.

360 एक्सप्लोरर मार्फत 15 ऑगस्ट रोजी युरोपातील सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकवण्याची मोहीम आयोजित केली गेली होती. यात 10 वर्षाचा साई कवडे हा एलब्रूस शिखर सर करणारा आशियातील सर्वात लहान मुलगा ठरणार आहे. 15 ऑगस्ट रोजी अंतिम चढाईला निघण्यापूर्वी आनंद बनसोडे आणि त्यांच्या मोहिमेतील सहकार्यांनी 73 फुटी तिरंगा एलब्रूस बेसकॅम्प (13000 फूट) वर फडकावून विदेशात सर्वात लांब तिरंगा फडकवण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. याची नोंद वेगवेगळ्या बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार आहे असे 360 एक्सप्लोररचे एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी सांगितले. आनंद बनसोडेंनी याआधी जुलै 2014 मध्ये माउंट एलब्रुस हे शिखर सर केले होते. यावर्षी माउंट एलब्रुस मोहिम हाती घेणाऱ्या टीमला मार्गदर्शक म्हणून पुन्हा या मोहिमेवर बनसोडे आले आहेत.

एलब्रूस मोहिमेनंतर 360 एक्सप्लोररची टीम भारतात येऊन लगेच कोल्हापूर सांगली येथे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जाणार आहे. कोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्त लोकांना या संकटातून सावरण्याची प्रेरणा देण्यासाठी युरोपातील सर्वोच्च शिखराच्या बेसकॅम्पवर खास कोल्हापुरी फेटा बांधून या टीमने तिरंग्याला अभिवादन केले. 360 एक्सप्लोरर ची ही विश्वविक्रमी टीम छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडावरील माती, छत्रपतींची प्रतिमा एलब्रूस शिखरावर घेऊन जाणार आहे. पुण्यातील साई कवडे हा सर्वात लहान आशियाई या शिखरावर प्रथम पाऊल ठेवणार आहे त्यामुळे गिर्यारोहन क्षेत्रातील संपूर्ण देशाचे लक्ष या मोहिमेकडे लागले आहे.

Leave a Comment