युवक क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांना रात्रीत अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कर्जत प्रतिनिधी | युवक क्रांती दलाचे सहकार्यवाह अप्पा अनारसे व सहकारी विनोद सोनवने, सागर जाधव आणि किशोर जाधव यांना कर्जत (अहमदनगर) पोलिसांनी अटक केली असून राशीन शहराचे युक्रांद शहराध्यक्ष किरण पोटफोडे यांना भाजपच्या स्थानिक गुंडांनी मारहाण केली आहे. तसेच त्यांच्या घरावर रॉकेल ओतून घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

हे सर्व कार्यकर्ते कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या राशीन येथे होणाऱ्या कार्यक्रमात शांततेने व संविधानाच्या मार्गाने निदर्शने करणार होते. कार्यक्रमापूर्वी शेतकऱ्यांना ‘संपूर्ण कर्जमाफी’बद्दल सवालही विचारणार होती. कार्यकर्ते यासंबंधीत निवेदन पोलिसांना देण्यास गेले असता, त्यांना अटक झाली आहे.

सत्ताधारी भाजपची महाजनादेश यात्रा, निवडणूकीपूर्वीचे कामाचे उद्घाटन, सत्तेची मग्रुरी आम्हा शेतकरी मुलांच्या मुळावर का? निवडणुकीपूर्वी गावाचा विकास करायला येता, तुमच्या सोयीनं गावकऱ्यांना कामाला लावता…अन उद्घाटनाचा नारळ फोडून जाता… ही फसवेगिरी आता शेतकऱ्यांच्या पोरांना कळायला लागलीय. म्हणूनच शेतकरी पुत्र गेल्या ५ वर्षातील १३ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारच्या टाळक्यात घालण्यासाठी शांततेनं निदर्शनं करणार होतो. मात्र, सरकारने पोलिसांना पुढं करून रात्रीत कार्यकर्त्यांना रात्रभर डांबून ठेवण्यात आले आहे.याउपरही स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी युक्रांद शहराध्यक्ष किरण पोटफोडे यांना जबर मारहाण केली असून त्यांचे घरही पेटवून देण्याचा प्रयत्न झाला आहे. पोलिसांनी आता, किरण यांनासुद्धा ताब्यात घेतले आहे. यात भाजप सरकार पोलिसांना पुढं करून आमच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही करत आहे. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार आपली पोळी भाजून घेण्याचं काम करत असल्याचे दिसून येत आहे. आमची मागणी आहे की, पोलिसांनी आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करावी. आम्ही सर्वोतोपरी पोलिसांना मदत करायला तयार आहोत. ‘संपूर्ण कर्जमाफीची’ गप्पा मारणारे सदाभाऊ आता मूग गिळून गप्प का? आम्ही युवक क्रांती दलाच्यावतीने झालेल्या सर्व प्रकाराचा निषेध करत असून आम्ही हुकूमशाही सरकारविरुद्ध लढतच राहू.

सदाभाऊ खोत यांना जसा सभा घेण्याचा अधिकार आहे, तसाच नागरिकांनाही लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पोलिसांनी दोघांच्याही अधिकारांचं रक्षण केलं पाहिजे. मारहाणीच्या घटनेचा तीव्र निषेध करतो. या घटनेत जातीयवाद करण्याचा प्रयत्न हाणून पाडू. एवढ्या सोप्या पद्धतीने हा विषय मिटणार नाही. माझे डीवायएसपी व पीआय यांच्याशी बोलणे झाले असून सदाभाऊ खोत यांनाही बोलणार आहे.
– डॉ.कुमार सप्तर्षी
अध्यक्ष, युवक क्रांती दल

फिर्यादीलाच ठेवले नजरकैदेत

पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली किरण पोटफोडे, किशोर जाधव, प्रकाश कदम, आकाश पोटफोडे, रवी लाटे, अतुल नंदा या कार्यकर्त्यांना घटनास्थळी नेऊन नजर कैदेत ठेवले आहे.

युक्रांद राशीन शहराध्यक्ष किरण पोटफोडे यांना काल झालेल्या मारहाणीनंतर पोलीस आज किरण यांच्या घरी चौकशी करायला आले होते. ज्या चौकात किरणला मारहाण झाली तेथे चला अस म्हणून पोलिसांनी युक्रांदच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळी नेले आणि सर्व कार्यकर्त्यांना पिंजऱ्यातून खाली न उतरू देता पिंजरा लॉक करून ताब्यात नजरकैदेत ठेवले आहे.

Leave a Comment