बुलढाणा प्रतिनिधी। अखेर रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर भाजपामध्ये जाणार अशी चर्चा राज्यात बऱ्याच दिवसापासून जोर धरू लागली होती. काल त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याकडे पाठवला. याबाबत विचारना करण्यासाठी रविकांत तुपकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र पुढील निर्णय लवकरच घेणार असल्याची माहिती सूत्राकडुन मिळालीये.
दरम्यान रविकांत तुपकरांनी कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री व रविकांत तुपकरांमध्ये जवळपास 1 तास चर्चा सुरु होती. रविकांत तुपकर म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनातील अग्रणी चेहरा होता. राजू शेट्टींसोबत त्यांनी चळवळीत काम केलं. त्यांच्याकडं आता प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी होती.
सदाभाऊ खोत यांनी संघटना सोडल्यानंतर स्वाभिमानीचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. तुपकर हे खादी ग्रामोद्योग महामंडळावर होते, पण स्वाभिमानी सत्तेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. मागे झालेली लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते. पण जागा न मिळाल्यामुळ त्यांनी माघार घेतली.