राखी बांधायच्या आधीच काळाने केली भावा-बहिणीची ताटातूट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई

रक्षाबंधन बहीण आणि भावाच्या नात्याची साक्ष देणारा दिवस. बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते तर मनगटावर बांधलेल्या राखीला साक्ष देत भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेतो.  बहीण-भावाच्या
पवित्र सणाच्या पूर्वसंध्येला मात्र एका भावंडांची ताटातूट झाली. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील पल्लवी गणेश पाचपोर ही 19 वर्षाची तरुणी आज या जगात नाही. रस्ते अपघातात तिचा मृत्यू झाला. पल्लवी ही अमरावतीच्या एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. आज रक्षाबंधन असल्याने काल तिचा भाऊ तिला आणायला अमरावतीला गेला होता. दोघे बहीणभाऊ अमरावतीहून परतवाड्याला परत येत असतांना अमरावती परतवाडा मार्गातील जवर्डी फाटा जवळ त्यांचा अपघात झाला. एका भरधाव ट्रॅव्हल्स बसने त्यांच्या स्कुटरला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने पल्लवीने जागीच प्राण सोडला. तर भाऊ किरकोळ जखमी होत बचावला. दुर्दैवाने मनगटावर राखी बांधण्यासाठी भावासोबत घरी येत असलेली बहीण मात्र या जगातून निघून गेली होती.

पल्लवीच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण परिवारावर दुःखाचे सावट पसरले आहे. पल्लवी ही कुटुंबात सगळ्यात लहान असल्याने ती सर्वांची लाडकी होती. अभ्यासात हुशार असलेली पल्लवी खूप शिकून आपल्या कुटूंबाचे नाव मोठे करण्याचे स्वप्न उरी बाळगून होती. मनमिळाऊ स्वभावमुळे घर आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरात ती सर्वांची लाडकी होती. परंतु तिच्या अशा अचानक गेल्याने परिसरातील लोक दुःख व्यक्त करत आहेत.

“माझा दादा मला उद्या न्यायला येतोय . आई दादाला लवकर पाठवशील मी छान राख्या आणल्या आहेत .दादा मी तुला आवडेल तशी राखी बांधेल.” असं म्हणणारी हक्काची बहीण आई वडिलांची लाडाची पल्लू ही रक्षाबंधन सारख्या पवित्र सणाला कायमचीच मुकली. तिच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

Leave a Comment