राज्यात सेना-भाजप स्वबळावर लढणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भाजप-शिवसेनेत युतीच्या जागावाटपावरून चर्चा सुरू असताना भाजप पक्षसंघटनेला विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज करण्यासाठी राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांत बूथप्रमुखांचे मेळावे सुरू असून त्याबरोबरच प्रत्येक मतदारसंघातील इच्छुकांशीही भाजपचे निरीक्षक चर्चा करत आहेत.

निवडणुकीच्या तयारीस लागण्याचा आदेश प्रदेश भाजपच्या बैठकीत घेण्यात आला होता.सर्व २८८ मतदारसंघांतसर्व आमदार, जिल्हाध्यक्ष, प्रभारी यांना आपापल्या भागात बूथनिहाय मेळावे घेऊन निवडणूक यंत्रणेतील शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा आदेश त्या वेळी देण्यात आला होता. त्यानुसार ऑगस्टच्या सुरुवातीपासून राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांत बूथनिहाय मेळावे सुरू झाले आहेत. प्रदेश पदाधिकाऱ्यांकडे पाच-दहा विधानसभा मतदारसंघ अशारीतीने या मेळाव्यांना निरीक्षक म्हणून उपस्थित राहण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे

भाजपा, शिवसेनेमध्ये सुरू असलेले मोठ्या प्रमाणावरील इनकमिंग पाहता या दोघांची विधानसभा निवडणुकीत युती होणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या दोन्ही पक्षांचे नेते युतीबाबत अद्याप तरी सकारात्मक भाष्य करत असले तरी जी परिस्थिती निर्माण होतेय ते वेगळचं सांगते आहे.

शिवसेना-भाजपमधील 25 वर्षांची युती तुटली ती 2014 च्या विधानसभा निवडणुकीत. त्यानंतर मात्र काही काळ विरोधी पक्षात बसलेल्या शिवसेनेनं भाजपशी जुळवून घेण्याचं धोरण स्वीकारलं. सत्तेत सहभागी झाल्यानंतरही अनेक बाबतीत शिवसेनेनं भाजपवर टीका केली.उद्धव ठाकरे यांनी तर युतीत 25 वर्ष सडल्याचं विधान करत यापुढे युती नाही अशी गर्जनाच केली होती. मात्र राजकारणात कोणतीही गर्जना काय राहिल याची शाश्वती नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी हेच स्पष्ट झालं. शिवसेनेनं जुळवून घेत भाजपशी युती केली. त्यानंतर या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे संबंध एवढे मधुर झाले की यापूर्वी हे कधी भांडलेच नव्हते, असं वाटावं. मात्र हे मधुर संबंध केवळ दाखवण्यापुरते आहेत का असाही संशय वारंवार उपस्थित होतो.

आता विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची घटीका समीप आली आहे. आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी भाजप-शिवसेनेत स्पर्धा आणि चढाओढ लागली आहे. एकीकडे युती होणारच असं भाजप-शिवसेनेचे नेते सांगत असले तरी 2014 ची विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजपाने वेगवेगळी लढली होती. या निवडणुकीत वर्षानुवर्ष शिवसेनेकडे असलेल्या काही जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्या जागांच्या वाटवापरूनही दोन्ही पक्षात गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाचे नेते सांगतात तेवढं युती होणं सोपं नक्कीच नाही.

Leave a Comment