पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पुण्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयाला काळे फासण्यात आले आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत हे अभाविपचे हे कार्यालय आहे. या वेळेस अभाविपच्या विरोधात घोषणा देखील देण्यात आल्या.एबीव्हीपी हाय हाय, मोदी शहा मुर्दाबाद अशा घोषणा या वेळेस देण्यात आल्या.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद देशभर उमटताना दिसत आहेत. पुण्यात देखील या घटनेचे पडसाद उमटत आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला असल्याचा आरोप होत आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अभाविपच्या कार्यालयाबाहेरील पाटीला काळे फासले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही भारतीय जनता पक्षाची विद्यार्थी शाखा आहे. विद्यार्थी राजकारणात या संघटनेचा सक्रिय सहभाग राहिला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार्यलयाला काळे फासल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.