राही सरनोबत यांना अर्जुन पुरस्कार, रुस्तम-ए-हिंद दादू दत्तात्रय चौगुले यांना ध्यानचंद पुरस्कार प्रदान

0
41
National Sport Awards
National Sport Awards
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | सतिश शिंदे

क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी महाराष्ट्रकन्या नेमबाज राही सरनोबत यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज अर्जुन पुरस्कार तर रुस्तम- ए- हिंद दादू दत्तात्रय चौगुले यांना ध्यानचंद पुरस्कार प्रदान करण्यात आला.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने आज राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये ‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०१८’ चे वितरण करण्यात आले. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) राज्यवर्धनसिंह राठोड, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री सर्वश्री रामदास आठवले आणि विजयसिंह सांपला, केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत,केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाचे सचिव राहुल भटनागर यांच्यासह विविध क्षेत्रातातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या शानदार कार्यक्रमात नेमबाज राही सरनोबत आणि रुस्तम- ए- हिंद दादू दत्तात्रय चौगुले यांना ध्यानचंद पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रत्येकी पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.

कोल्हापुरात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत राही सरनोबत या नेमबाजीमधील २५ मीटर ०.२२ स्पोर्टस पिस्टल प्रकारातील आघाडीच्या नेमबाज आहेत. नुकतेच जकार्ता (इंडोनेशिया) येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत त्यांनी भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण तर याच वर्षी आशियाई स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक पटकावले होते. २००८ साली झालेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले सुवर्णपदक पटकाविले. त्यानंतर २०१० साली नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दादू दत्तात्रय चौगुले यांनी कोल्हापुरात हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवले. दादू चौगुले यांनी ३ मार्च १९७३ ला मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुपर हेवी गटात ‘रुस्तम-ए-हिंद’ हा मानाचा किताब पटकावला. त्यानंतर ३ एप्रिल १९७३ ला नवी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत सुपर हेवी गटात ‘महान भारत केसरी’ हा किताब पटकावला. दादू चौगुले यांनी १९७० मध्ये पुणे येथे व १९७१ साली आलिबाग येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत ‘महाराष्ट्र केसरी’ हा किताब पटकावला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी ध्यानचंद पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

क्रिकेटपटू स्मृती मानधना यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. मात्र, श्रीलंकेत सुरु असलेल्या क्रिकेट सामन्यामुळे त्या आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहू शकल्या नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here