पुणे | मयुर डुमने
‘स्त्रियांनी काय लिहावं, काय लिहू नये याचे अदृश्य नियम पुरुषी व्यवस्थेने घालून दिले आहेत. या अदृश्य बंधनांचा प्रभाव इतका आहे की बहुतांश वेळा स्त्रिया ती बंधने स्वतःवरती लादून घेतात आणि मोकळेपणाने व्यक्त होत नाहीत. पुरुषी व्यवस्थेने घालून दिलेली ही बंधने स्त्रियांनी तोडून लिहायला सज्ज झाल पाहिजे’ असे मत प्रसिद्ध कवियित्री अंजली कुलकर्णी यांनी व्यक्त केले. डॉ. सारिका शिंदे लिखित “आयुष्य” या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित अभ्यंकर, सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस या प्रसंगी उपस्थित होते.
आपल्या समाजामध्ये लेखकांवरती अभिव्यक्तीची बंधनं ही कायमच आली आहेत. लेखक, कवी, विचारवंत, कार्यकर्ते यांच्यासाठी आताचा जो काळ आहे तो अत्यंत निराशाजनक आणि भयभीत करणारा आहे आणि दिवसेंदिवस ही परिस्थिती आपल्याला तीव्र होताना दिसते आहे. लेखक कवींच्या स्वतंत्र वृत्तीवर घाला घातला जात असल्याचे मत देखील अंजली कुलकर्णी यांनी व्यक्त केले. आम्ही फक्त कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले मात्र कामगारांच्या जीवनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही याचा फटका कम्युनिस्ट चळवळीला बसल्याची कबुली कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर यांनी यावेळी दिली.
“समकालीन सांस्कृतिक व साहित्यिक चळवळी समोरील आव्हाने ” या विषयावर बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस म्हणाले की, ” भारतीय लोकशाही मध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेली कम्युनिस्ट सरकारे संपत चालली आहेत, सर्वच प्रकारच्या चळवळी ओसरत चालल्या आहेत मार्क्सवाद फसलेला नाही पण मार्क्सवादाच्या मार्गाने जाणाऱ्या चळवळीत फाटाफूट झाली आहे. संत आणि क्रांतिकारक यांमध्ये भेदरेषा आखली जात आहे, फुले आणि आंबेडकर संतांपासून वेगळी मानली जात आहेत. आम्ही आंबेडकर , फुले स्वीकारतो पण ज्ञानेश्वर ते संत तुकाराम, शेख महंमद ही आपली परंपरा आपण स्वीकारत नाही ही आपल्या प्रबोधनाच्या चळवळीतील उणीव आहे. जे मातीतील आहे ते आपल्याला विसरून चालणार नाही. माती मधली माणसं मातीत उभी राहत असताना घट्ट उभी राहत असतात त्या माणसांचा मेंदू त्या मातीच्या संस्कार आणि संस्कृतीवर उभा असतो ते संस्कार समजून घेतल्याशिवाय आपला विचार आणि आपली चळवळ व्यापक होऊ शकत नाही.” प्रवीण वाघमारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.