लेथ जोशी : जुन्या गोष्टींतील नवीन बदल

thumbnail 1532115425449
thumbnail 1532115425449
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शनिवार विशेष

चित्रपट परिक्षण : लेथ जोशी

लेखक : अझीम अत्तार

माझ्या वडिलांना कंपनीत काम करून नुकतेच १ जुलै ला ३१ वर्षे पूर्ण झाले. ३१ वर्षे एका कंपनीत एका मशीनवर वर्कर म्हणून काम करणे ही तशी सोपी बाब नाही. ८७ च्या काळात पोरसवदा वयात चालू केलेलं काम एखादा माणूस सलग ३१ वर्षे करतो आणि अजूनही तोच उत्साह ठेवतो, हे माझ्यासारख्या चंचल आणि झटपट यश हवं असलेल्या तरुणाला नाही कळणार. किंबहुना मी बऱ्याचदा हा विचार करतो की आयुष्याच्या उमेदीच्या वर्षांत तेच ते काम करून कंटाळा बरं कसा आला नसेल, खासकरून जेव्हा मला दर २-३ वर्षांनी काहीतरी नवीन काम हवं असतं.

जेव्हा जेव्हा आमच्या घरात त्यांच्या कामाचा उल्लेख येतो, तेव्हा तेव्हा ते आम्हाला बड्या उमेदीने त्यांचं काम समजावून सांगतात. म्हणजे इंजिन वाॅल्व ला स्ट्रेटनिंग मशिन मध्ये ठेवल्यानंतर कसं त्याचं स्टेम आणि हेड, रोलर ने बरोबर शेप मध्ये येतात आणि तो तापलेला इंजिन वाॅल्व पुढच्या प्रोसेसिंगसाठी दुसऱ्या मशीन कडे पाठवला जातो. कुठल्या कुठल्या कंपनीकडून त्यांना आॅर्डर्स येतात आणि त्यांची मशीन किती भारी काम करते, हे सगळं ऐकताना मला दिनू आठवतो, “टेक्नॉलॉजी अशी अशी बदलतीए. कामं करायला लोक असे रोबोट बनवताहेत, जे बिघडले की स्वतःच स्वतःला रिपेअर करतील. आणि काये लेथ बिथ. ”

‘लेथ जोशी’ या ‘मंगेश जोशी’ दिग्दर्शित मराठी चित्रपटातील सरळमार्गी, मितभाषी जोशी (चित्तरंजन गिरी) एका छोट्या प्रोडक्शन कंपनीत काम करत असतात. दिनू (ओम भूतकर) हा त्यांचा हरहुन्नरी, इलेक्ट्रोनिक गॅझेट्सशी लिलया खेळणारा मुलगा. जोशींनी तब्बल ३५ वर्षे लेथ मशीन वर काम केलंय आणि आता अॅटोमेशन आल्यामुळे मालकाने त्यांचं Manual Production Workshop बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता घरी बसलेल्या जोशींना दुसरं काम शोधायची पाळी येते आणि लेथशिवाय दुसरं काही काम येत नसल्यामुळे आणि मुळात लेथ हाच प्रकार हळूहळू कालबाह्य होत असल्या कारणाने त्यांची कुचंबणा होते. जोशींची परिस्थिती तशी जेमतेमच. घरात मुलगा दिनू, आंधळी आई आणि बायको. बायको बाहेरून स्वयंपाकाच्या, फराळाच्या आॅर्डर्स घेऊन घराला हातभार लावत असते. चित्रपटात कुटुंबाचं आणि परस्परांतील नात्याचं अतिशय बारीक आणि नेमकं सादरीकरण करण्यात आलेलं आहे .

‘सेवा चौहान’ यांनी साकारलेली आंधळी आजी, जिला टीव्ही पाहण्याची (ऐकण्याची) खूप आवड आहे. तिचा सुनेवरती सारखा राग काढणं, देवाचा जप करणं, दिनूचं सारखं येता-जाता आपल्या आजीची चेष्टा करणं, आईची आपली आॅर्डर्स पूर्ण करायची रोजची धडपड, त्यांचं एकत्र बसून Serials पाहणं, मुलाचं आपल्या नकळत सिगारेट ओढणं, गाडी चालवायला शिकणं आणि हे कळाल्यावर आश्चर्यात पडलेला बाप. या साऱ्या गोष्टी त्या कुटुंबाची हलकीफुलकी वातावरण निर्मिती करतात.

परंतु चित्रपटाचा मुख्य आशय हा ‘बदल’ आहे. प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने होणारा बदल. मग ते काम असो, घर वा गोष्टींकडे पाहण्याची आपली दृष्टी. आणि हाच बदल जेव्हा वेगाने होतो आणि त्याला प्रगती हे नाव दिलं जातं, तेव्हा त्या बदलांशी जुळवून घेताना उडणारी तारांबळ. या सर्व गोष्टी लेथ जोशी चित्रपटात अतिशय प्रतिकात्मक पद्धतीने टिपल्या गेल्या आहेत.

मग ते कणीक मळण्याचं फुड प्रोसेसर असो, जपाचं मशीन असो, ग्रहशांतीला केलेलं चायनीज वा घेतलेली नवीन कार…आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींना हाच नियम लागू होतो आणि माणूस नकळत या बदलांना सामावून घेतो .

या अविरत आणि महत्वाकांक्षेने धावणाऱ्या जगात ‘जोशी’ हे समाजाचा तो भाग अधोरेखित करतात, ज्याने आयुष्यभर एक ठराविक प्रकारचं काम केलंय आणि या क्षणोक्षणी बदलणाऱ्या जगाच्या पावलावर पाऊल ठेवून धावणं त्यांना जमलं नाहीए. (असे जोशी आपल्याला काही तरुणांत पण दिसतात, ज्यांना उर फुटेस्तोवर धावायचं नाहीए किंवा जगाच्या वेगात बदलता येत नाहीए). पण मग त्यांना शिंदे साहेबांचं वाक्य चपखल बसतं, “कसंय जोशी, आजच्या काळात अपग्रेड होणं फार महत्वाचं आहे. नाहीतर बाहेर फेकले जाऊ आपण”.

चित्रपटातील दिनू हा सर्व नवनिर्मितीतील आणि सळसळत्या तरुणांचं प्रतिनिधित्व करतो, ज्यांचा वेळच मुळी नवनवीन गेझेट्स शिकण्यात आणि त्यांना अपग्रेड करण्यात जातो. या पिढीला जुन्या गोष्टींना कवटाळणे आणि एखाद्या ठिकाणी निवांत थांबणे, असल्या टाईमपास गोष्टींसाठी वेळच नाहीए. ती नेहमी नवीन च्या शोधात पळत राहते. आणि सौ. जोशी (अश्विनी गिरी) या त्या आहेत ज्यांना नवनवीन गोष्टींचं कुतूहल आणि आकर्षण आहे. मग त्या दैनंदिन वापरातल्या वस्तू असोत वा राहणीमान, ते नेहमी या बदलांकडे नकळत ओढले जातात .

चित्रपटातील चित्रीकरणाचा वेळ, हा अभ्यासाचा अजून एक विषय. जेव्हा जेव्हा जोशी आणि त्यांचं पूर्वापार चालत आलेलं राहणीमान याभोवती कॅमेरा फिरतो, तो खूप संथ असतो. याउलट जेव्हा जेव्हा दिनू पडद्यावर येतो आणि काळानुरूप बदललेल्या गोष्टी येतात, तेव्हा तेव्हा कॅमेरा पटपट फिरतो. जुनं आणि नवीन, पूर्वापार चालत आलेलं आणि जगाच्या वेगानुसार अपग्रेड झालेलं यांतला विरोधाभास आपल्याला प्रत्येक फ्रेम मधून स्पष्ट दिसतो .

आणि जोशींची हतबलता अजूनच केविलवाणी आणि खरी वाटते जेव्हा त्यांचा सहकारी म्हणतो , “बास झालं जोशी . या जगाच्या वेगाशी आपला निभाव नाही लागणार आता”.

चित्रपटात संगीताचा वापर तसा कमी आहे, मात्र आपल्या दैनंदिन वापरातल्या वस्तूंचा आवाज चपखलपणे वापरून परिणामकारक मांडणी झाली आहे. ‘चित्तरंजन गिरी’ हे पूर्ण चित्रपटभर शांत, संयत, गंभीर वावरतात . त्यांची हळू चालणारी सायकल त्यांच्या आयुष्यातला संथपणा दर्शवते .

परंतु नेहमी गंभीर असणाऱ्या जोशींबद्दल जेव्हा त्यांचे मालक “हे आमचे लेथ जोशी. कलाकार आहेत कलाकार” असं म्हणतात. तेव्हा आपल्या जोशी आडनावासोबत लावलेलं लेथ त्यांना सर्व दुःख विसरायला लावतं, त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं निर्मळ हास्य पूर्ण चित्रपटभर पुरून उरतं आणि त्यांची सायकल वेगाने धावू लागते.

अझिम अत्तार

(लेखक चित्रपट अभ्यासक असून साॅफ्टवेअर इंजिनिअर आहेत)