टीम, HELLO महाराष्ट्र |श्रावण महिन्यात मऊ धुकं, केसरी ऊन, आणि अनेक सण उत्सव असतात. त्यामुळे हा महिना सर्वांनाच खूप आवडतो. याच महिन्यात सर्वांच्या लाडक्या गणरायाच ही आगमन होत त्यामुळे हा महिना अजूनच उत्साही होतो आणि या गणेशउत्सवाचे सर्व श्रेय जाते ते लोकमान्य टिळकांना परंतु, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव याचा नेमका काय संबंध आहे ते आपण जाणून घेऊ.
आज आपल्याला देशभरात आणि परदेशातही गणेशोत्सव पोहोचलेला दिसतो, त्याचे श्रेय लोकमान्य टिळकांना आहे. १८९३ मध्ये पुण्यात दंगा झाला असता, त्याचा विचार करण्यासाठी पुण्यातील पुढाऱ्यांची बैठक जमली. यात वैद्य भाऊसाहेब रंगारी, गणपतराव घोटवडेकर, नानासाहेब खासगीवाले यांनी समाजात एकोपा निर्माण व्हावा सर्वजण एकत्र यावेत म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याचे ठरवले. नंतर २६ सप्टेंबर १८९३ च्या केसरीच्या अंकात टिळकांनी गणेशोत्सवाचे स्वागत केले.
दरम्यान दुसरा लेख १८ सप्टेंबर १८९४ रोजी छापून आला. ‘केसरी’च्या अग्रलेखात ते लिहितात, ‘यंदाचा भाद्रपद महिना व विशेषतः गेली अनंत चतुर्दशी वगैरे दिवस मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाच्या अक्षरांनी नोंदण्यासारखे लाभले. यंदा आम्हा मराठ्यांचा आधारस्तंभ जो वैश्यवर्ग अगर प्रत्यही निढळाच्या घामाने पैसा मिळवून आम्हा सर्वांची तोंडे उजळ करणारा साळी, माळी, रंगारी, सुतार, कुंभार, सोनार, पाणी, उदमी इत्यादी औद्योगिक कामे करणाऱ्यातील लोकांना यंदा विलक्षण रीतीचे स्फुरण येऊन त्यांनी हा दिवस साजरा करण्याची जी काही मेहनत घेतली, ती केवळ अपूर्व आहे. दिवसभर कामधंदा करून घरी आल्यावर चकाट्या पिटीत बसणारे, दारू पिऊन झिंगल्यामुळे गटारात लोळणारे व या दारूच्या पायी बायकापोरांचे हाल करणारे अथवा तमाशामध्ये अचकट-विचकट गाणी ऐकत बसणारे या सर्वांना निदान काही काळापर्यंत तरी उपरती होऊन त्यांचा रिकामा वेळ बुद्धिदात्या श्री गजवदनाच्या भजनपूजनात गेला, ही गोष्ट काही लहान, सामान्य नाही. मेळ्यांचा सरंजाम पाहून तर आमची मती गुंग झाली. मेळेवाल्यांचा पोशाख, ताल धरणाऱ्या काठ्या, त्यांचा आवाज, एकाच ठेक्याने चालणारी पावले, त्यांचे भक्तिरसाने ओथंबलेले ते गाणे, सर्वत्र स्वधर्माच्या स्तुतीने भारलेले ते कर्णमधुर आलाप, आमच्या मराठे बंधूंचा तो वीरश्रीयुक्त उत्साह आणि त्यांची ती भव्य निशाणे. गणेशोत्सवा संदर्भात टिळकांनी आपली अशी भूमिका मांडली.
उत्सवाच्या फलश्रुतीसंदर्भात टिळक लिहितात, ‘संकटसमयी एकमेकांस उपदेशाची, पैशाची, सल्लामसलतीची मदत करणे, एकमेकांस सज्ञान करण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादी प्रेमसूचक गोष्टींनी आपले युग्म विशेष संलग्न होत जाणारे आहे. तेव्हा ज्या योगाने आपला संबंध निकटतर होत जाईल, त्या त्या गोष्टी करणे आणि करविणे हे आपले आद्यकर्तव्य आहे.’