वकील व्हायचंय? लाॅ शाखेला प्रवेश घ्यायचाय? अशी कराल प्रवेश परिक्षेची तयारी.

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र : विधी शाखेतील वाढत्या संधींचा विचार करता अलीकडील काही काळात लाॅ मधे करिअर करु इच्छिणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लाॅ ही शाखा आज अनेक तरुणांना आकर्षीत करत असून लाॅ ची पदवी घेतल्यानंतर करिअरच्या अनेक संधी निर्मान होताना दिसत आहेत.

लाॅ शाखेचीच निवड का म्हणुन ?
१२ वी ची परिक्षा पास झाल्यानंतर किंवा पदवीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर आता पुढे काय करायचे हा प्रश्न सर्वांनाच सतावत असतो. पुर्वी १२ वी झाल्यानंतर अभियात्रिकी शाखेला प्रवेश घेण्याचा ट्रेंड तयार झाला होता. परंतु आता इंजिनिअरिंगसारख्या तात्रिकी शिक्षणाला म्हणावा तसा वाव राहिलेला नाही. तसेच विज्ञान, वाणिज्य, कला यांसारख्या शाखांमधून चांगल्या गुणांनी पदवी घेतलेले अनेक युवक सुद्धा बेरोजगारीचा सामना करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीमधे लाॅ हे क्षेत्र तरुणांना आश्वासक वाटत आहे. शिवाय वकिलीचे शिक्षण कधीच वाया जात नाही; ते आज ना उद्या आपल्या कामाला येतेच असेही बोलले जाते, त्यामुळे तरुण वर्ग लाॅकडे आकर्षीत होत आहे. विशेषत: यु.पी.एस.सी – एम.पी.एस.सी अशा स्पर्धा परिक्षांची तयारी करणार्या युवकांसाठी लाॅ एक पर्वणीच ठरत आहे. स्पर्धा परिक्षांमधून येणार्या अस्थिरतेवर मात करण्यासाठी लाॅ चे शिक्षण स्पर्धापरिक्षा विद्यार्थ्याना मदत करत आहे. आज बरेच विद्यार्थी स्वत:ची नोकरी वा इतर अभ्यास सांभाळून लाॅ ला प्रवेश घेताना दिसत आहेत. तेव्हा, जर तुम्ही १२ वी पास असाल कींवा तुम्ही कोणत्याही शाखेमधून पदवीचे शिक्षण पुर्ण केलेले असेल आणि आता वकिल होण्याचे स्वप्न पाहत असाल, लाॅ शाखेला प्रवेश घेण्याचा विचार करत असाल तर मग तुम्ही अगदी योग्य मार्गावर आहात असे समजण्यास हरकत नाही.

लाॅ मधिल करिअरच्या संधी
लाॅ शाखेची पदवी घेतल्यानंतर करिअरच्या अनेक संधी आहेत. सर्वप्रथम लाॅ पुर्ण झाल्यानंतर कोणत्याही न्यायालयामधे वकिली सुरु करता येते. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय ते अगदी स्थानिक न्यायालयांमधे वकीली करण्यास तुम्ही पात्र होता. याशिवाय सरकारी क्षेत्रातील अनेक पदांकरिता घेण्यात येणार्या परिक्षांसाठी तुम्ही पात्र होता. यामधे न्यायाधीशांपासून सरकारी वकील इत्यादी पदे येतात. तसेच याव्यतिरिक्त अनेक कंपन्यामधे लीगल अॅडव्हायजर या पदाच्या अनेक जागा रिक्त असतात. काॅर्पोरेट क्षेत्रातसुद्धा नोकरीच्या अनेक संधी आहेत. महिलांकरीता लाॅ नंतर संरक्षण खात्यातसुद्धा अनेक संधी उपलब्ध आहेत. विविध लाॅ फर्म्स मधेही तुम्ही रुजू होऊन चांगला पगार मिळवू शकता. जर तुमच्यामधे पॅशन असेल आणि जिद्द व चिकाटीने काम करण्याची तयारी असेल तर या क्षेत्रामधे संधींना अंत नाही असे म्हणण्यास हरकत नाही.

सी.ई.टी. प्रवेश परिक्षा
विधी शाखेला प्रवेश घेण्यासाठी नेशनल इन्स्टिट्युट आॅफ लाॅ करीता CLAT ही परिक्षा द्यावी लागते तर महाराष्ट्रातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेण्याकरिता MHT – CET Law ही प्रवेश परिक्षा द्यावी लागते. पुर्वी पदवीच्या गुणांवरुन लाॅ शाखला प्रेवश मिळत असे परंतू २०१६ पासून शासनाने लाॅ प्रवेशासाठी प्रवेश परिक्षा घेणे सुरु केले आहे.

बीए.एल.एल.बी. आणि एल.एल.बी –
१२ वी नंतर विधी शाखेला प्रवेश घेणार्यांसाठी BALLB हा कोर्स असतो तर कोणत्याही शाखेतून पदवी पर्यंतचे शिक्षण पुर्ण करणार्यांसाठी LLB हा कोर्स असतो. BALLB या कोर्स चा कालावधी ५ वर्षांचा असतो तर LLB चा कालावधी ३ वर्षांचा असतो. या दोन्ही कोर्सेस करिता दरवर्षी सी.ई.टी. प्रवेश परिक्षा घ्याण्यात येते. हजारो विद्यार्थी या परिक्षेला बसतात. त्यातील साधारणत: १५००० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.

प्रवेश परिक्षेचे स्वरुप व अभ्यासक्रम –
विधी शाखेची प्रवेश परिक्षा १५० गुणांची व बहुपर्यायी स्वरुपाची असते. इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि लिगल अॅप्टीट्युड हे विषय परिक्षेसाठी असतात. या परिक्षेमधे निगेटीव्ह मार्कींग पद्धत वापरली जात नाही. ही परिक्षा आॅनलाईन पद्धतीने घेण्यात येते. परिक्षासाठी २ तास वेळ देण्यात येतो तसेच ही प्रवेश परिक्षा मराठी किंवा इंग्रजी अशा कोणत्याही माध्यमातून देता येते. सन २०१८ साली होणारी प्रवेश परिक्षा आजवरची तिसरी प्रवेश परिक्षा असल्याने बाजारात म्हणावे त्या दर्जाची पुस्तके अजून उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उपलब्ध साहित्यातून अभ्यास करावा.

प्रवेश प्रक्रीया
प्रवेश परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काहीच काळात लाॅ साठीची प्रवेश प्रक्रीया चालू होते. सी.ई.टी. च्या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात. संपुर्ण प्रवेश प्रक्रीया आॅनलाईन पद्धतीने होते. प्रवेशाच्या साधरणत: ૪ ते ५ फेर्या होतात. विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या फेर्या सुरु होण्यापूर्वी महाविद्यालयांची पसंती यादी जमा करण्यास सांगण्यात येते. पसंती याद्यांच्या आधारे विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार महाविद्यालये दिली जातात.

अर्ज कसा भराल, अर्ज भरण्याची शेवटची तारिख –
इच्छुक विद्यार्थी www.dhepune.gov.in कींवा dhe.mhpravesh.in या वेबसाईटवर अर्ज भरु शकतात. एल.एल.बी. साठीच्या सी.ई.टी. परिक्षेचे अर्ज १५ एप्रिल पासून उपलब्ध झाले असून १५ मे ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. १२ वी नंतर देता येणारी बी.ए. एल.एल.बी. साठीच्या प्रवेश परिक्षेसाठीची अर्ज भरण्याची मुदत संपली आहे.

ही महाविद्यालये लाॅसाठी प्रतिष्ठीत
पुण्यामधील आय.एल.एस. महाविद्यालय लाॅ साठी प्रतिस्ठीत मानले जाते. देशातील टाॅपच्या पहील्या पाच महाविद्यालयांमधे या विद्यालयाचा समावेश होतो. त्यानंतर मुंबई येथील शासकीय विधी महाविद्यालयाचा (जी.एल.सी.) नंबर लागतो. याचबरोबर के.सी. लाॅ काॅलेज (मुंबई), नवलमल फिरोदिया लाॅ काॅलेज (पुणे), सिद्धार्थ लाॅ(मुंबई) इत्यादी महाविद्यायेही प्रतिष्ठीत मानली जातात.

तर मित्रांनो, विधी शाखेला प्रवेश घेण्याचा तुमचा निर्णय पक्का असेल तर आता प्रवेश परिक्षेच्या तयारीला लागा. लाॅ ची पदवी घेतल्यानंतर तुमचे भविष्य उज्वल आहे यात शंका नाही. तुम्हा सर्वांना शुभेच्छा.

Leave a Comment