बामणोली | दिपावलीच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची सातारा येथील वासोटा किल्याकडे पावले वळत आहेत. बामणोली आणि तापोळा येथे पुण्या मुंबईचे पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असून यामुळे भागात उत्साहाचे वातावरण दिसत आहे.
शिवकालीन वासोटा या अतिदुर्गम किल्ल्यावर जाण्यासाठी तरुण वर्ग व ट्रेकर्सनी बामणोली येथे मोठी गर्दी केली होती. त्यामुळे परिसरातील सर्व हॉटेल्स, टेंट हाऊस, कृषी पर्यटन केंद्र्रे पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाली. काही हौशी पर्यटकांनी नदीच्या काठावर छोटे तंबू लावून त्यात राहण्याचा आनंद घेतला.
सध्या कोयना जलाशयात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने थंड, आल्हाददायक वातावरणात वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी अनेकांची पसंती असते. बामणोली येथे वन्यजीव विभागाची परवानगी घेतल्याशिवाय किल्ल्यावर जाता येत नाही. बामणोली येथे मुक्काम करून सकाळी लवकर बोटीमधून किल्ल्याकडे निघाले तरच एक दिवसात वासोट्याची चांगली ट्रीप होते. बामणोलीप्रमाणेच मिनी काश्मीर तापोळ्यालाही पर्यटकांनी बोटिंगसाठी मोठी गर्दी केली होती. तापोळा येथे असणाऱ्या स्पीड बोट, पायंडल बोट, लॉच यांना मागणी वाढली.