विधानसभा निवडणुकांचा मुहूर्त ठरला ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र | विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरु झाला असून राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य मतदारांना निवडणुकांचे वेध लागले आहेत. येत्या 13 सप्टेंबरला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात मतदान होण्याची चिन्हं आहेत. राज्यात 22 ऑक्टोबरपर्यंत नवी विधानसभा अस्तित्वात येणं गरजेचं असल्याचं निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितलं आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान 31 दिवस आवश्यक असल्याने सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणुकांची घोषणा होईल. त्या सोबतच राज्यभरात आचारसंहिता लागू होईल.

अनंतचतुर्दशी 12 सप्टेंबरला झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजे शुक्रवार 13 सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर होऊ शकतं. 25 ऑक्टोबरला दिवाळी असल्यामुळे त्यापूर्वीच मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याकडे निवडणूक आयोगाचा कल असेल. मंत्रिमंडळ अस्तित्वात येण्यासाठी मात्र दिवाळीनंतरचा मुहूर्त लागेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. निवडणुकांसाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांसह सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेना-भाजप युतीमध्ये लढणार असल्याचं सांगत असले तरी अंतिम निर्णय झालेला नाही. दोन्ही पक्षांकडून स्वबळाची चाचपणी सुरु आहे.

राष्ट्रवादी, काँग्रेस यांचाही आघाडी करण्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. मनसे आघाडीच्या गोटात सामील होणार, की स्वतंत्र लढणार, स्वबळावर लढल्यास किती जागांवर उमेदवार देणार, हे अद्याप निश्चित नाही. वंचित बहुजन आघाडीही महाराष्ट्रात संपूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. त्यामुळे राज्यात किती ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढती होणार, कुठे चुरशीची स्पर्धा होणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

Leave a Comment