ठाणे प्रतिनिधी | आजचा दिवस महाराष्ट्रासाठी तितकाच उत्साहाचा आणि दुःखाचा देखील आहे. आजचा दिवस आहे आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा दिवस. दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर जड अंतःकरणाने गणपती बाप्पाचे गुरुवारी विसर्जन होत असून, विसर्जनासाठी मुंबईसह नवी मुंबईतील चौपाट्या, तलाव, कृत्रिम तलाव येथे मोठी गर्दी उसळली आहे.
विसर्जन सुरळीत व्हावे यासाठी पोलिस, महापालिका यांसह सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. दरम्यान संपूर्ण राज्य लाडक्या बाप्पा ला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहे. पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या प्रमुख शहरांमध्ये प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. भाविकांना कोणत्या हि प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी कर्मचारी सज्ज झाले आहेत. तसेच यावेळी सगळीकडे कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून सर्वाना करण्यात आहे.
या सर्वांमध्ये नेहमीच धावपळीचे कर्तव्य करीत असणाऱ्या आणि सुरक्षेसाठी दक्ष असणाऱ्या पोलिसांनी देखील मिरवणुकीचा आनंद घेतला. ठाण्यातील पोलीस बांधवांनी आज अनंत चतुर्दशी च्या दिवशी बंदोबस्ताच्या पूर्वीच बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात केली. या विसर्जनाच्या मिरवणुकीत पोलीस बांधव मोठया संख्येने सहभागी झाले आहेत. त्यांनी विसर्जनाच्या मिरवणुकीत वाद्याच्या तालावर ठेका धरला. यावेळी मिरवणुकीमधील त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. नेहमीच आपल्या कर्तव्याच्या ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांनी थोडा वेळ काढून सामान्य नागरिकांप्रमाणे आनंद लुटला. या आनंदात काही महिला पोलीस देखील सहभागी झाल्याचे पाहण्यात आले.