मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज, शुक्रवारी दुपारी दोन वाजता स्वत:हून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील बॅलार्ड पियर येथील कार्यालयात हजर होणार आहेत. मात्र, चौकशीसाठी अद्याप समन्स बजावलेले नसल्याने पवार यांना ईडी कार्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे. या सगळ्या घडामोडींमुळे मुंबईत तणावाची परिस्थिती आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयात शुक्रवारी स्वत:च उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले होते. त्यामुळे आता ‘ईडी’समोरच पेच निर्माण झाला आहे. आज दुपारी दोनच्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयात पोहोचतील. परंतु ‘ईडी’ त्यांना कार्यालयात प्रवेश नाकारण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणात ‘ईडी’ने शरद पवार यांना अद्याप चौकशीसाठी बोलावलेले नाही. जोपर्यंत अधिकृतपणे चौकशीसाठी बोलाविले जात नाही, तोपर्यंत अभ्यागतांच्या चौकशीचे कोणतेही अधिकार ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांना नसतात, याकडे सूत्रांनी लक्ष वेधले आहे. यामुळे या प्रकरणात ‘ईडी’ची पंचाईत झाली आहे.