सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
जिल्ह्यातील लोकांना जो निर्णय अपेक्षित होता तो मी घेतलेला आहे आणि त्यावर मी ठाम आहे. सध्याच्या शासनाने अनेक कामे मार्गी लावली असून लोकसभेची पोटनिवडणूक ही आता जनतेनेच हातात घेतलेली आहे या माझ्या मताशीच माझे विरोधक श्रीनिवास पाटील हे सहमत आहेत अशी टिपणी उदयनराजे भोसले यांनी केली. उदयनराजे यांनी पाटण येथे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले आज थोरले साहेब अर्थात शरद पवार हे साताऱ्यात येऊन मला काय आशीर्वाद देतात हे पाहावे लागेल. आता नरेंद्र पाटील, शंभूराज आणि मी असे एकत्र झालो आहोत. त्यामुळे मी पाटणची चिंता सोडलेली आहे.
कऱ्हाड – चिपळून हा रेल्वे मार्ग मध्य रेल्वेच्या माध्यमातून कोकणशी जोडला जाणार असल्याने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात व्यापाराचे जाळे निर्माण होईल असंही भोसले यांनी सांगितले. गेल्या पंधरा वर्षात कृष्णा खोरे प्रकल्पाची कामे काँग्रेस – राष्ट्रवादी सरकारने पूर्ण करायला पाहिजे होती. ती आता भाजप – सेना युती सरकारने हाती घेत मार्गी लावलेली आहेत असंही भोसले म्हणाले.