शाहू महाराज हायस्कुलमध्ये माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न; जुन्या आठवणींना उजाळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर,प्रतिनिधी सतेज औंधकर : गांधीनगर येथील छत्रपती युवराज शाहू महाराज हायस्कुलमधील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. सन १९७८ ते २००८ पर्यंतच्या बॅचमधील वेगवेगळ्या शहरात राहणारे जवळपास ३०० मित्र-मैत्रिणी आणि सर्व गुरुजन या सोहळ्यास उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन हे शाळेत तसेच कोल्हापुरातील हॉटेल वृषाली येथे करण्यात आले होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

या कार्यक्रमात उत्कृष्ट अँकरिंग, मिमिक्री आणि सहज सुंदर आखणी. आपल्या आवाजाच्या जोरावर फक्त विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकांना पण ठेका धरायला लावणारे आपले विद्यार्थी गायक यांनी हा दिवस मनोरंजन आणि जल्लोषाने परिपूर्ण केला. सर्व जुन्या आणि विद्यार्थीप्रिय शिक्षकांचे आगमन होताच विद्यार्थ्यांनी आपल वय विसरून त्यांना अभिवादन करत चरणस्पर्श केले. शिक्षक आणि शिपाई यांचा सत्कार केला. कार्यक्रमात शिक्षक आणि माजी विद्यार्थी यांची मनोगते झाली. यावेळी प्रत्येकानी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

माजी विद्यार्थ्यांमधील हौशी गायकांनी तर हा दिवस संगीतमय करत मनोरंजनाची एक वेगळीच आणि अतिसुंदर अशी दुनिया उभी केली आणि या कार्यक्रमाला गुंफून ठेवताना सूत्र संचालन आणि मिमिक्री सादर करत एक एक क्षण जल्लोशपूर्ण बनवला. पंचपक्वान्न स्नेह भोजन करताना बालपणीचे दिवस आठवत प्रत्येकाने एक- एक क्षण जागा केला अन जगला.

कार्यक्रमापूर्वी सर्व माजी विद्यार्थी शाळेत जमा झाले होते. रविवारचा दिवसा होता. तरीही सकाळी सकाळीच शाळेची घंटा वाजली. एकामागे एक असे विद्यार्थी एका हाताचे अंतर राखून उभे राहिले. पण दंगा आणि मस्ती कांही थांबत नव्हती. कोण म्हणतो “सर याने माझा चिमटा काढला” तर कोण म्हणते “सर ही बघा मला डिवचत आहे” कांही केल्या विदयार्थी शांत होत नव्हते, अशातच एक आवाज आला ” परेड सावधान” आणि त्यासरशी सारे विद्यार्थी सावधान झाले आणि दंगा शांत झाला. काही वेळात शाळेची प्रार्थना “सर्वात्मका शिवसुंदरा” ही अगदी एकसुरात पार पडली. पाठोपाठ राष्ट्रगीत झाले आणि भारत मातेचा जयघोष झाला.

आता पीटीचा तास….कवायत करता करता घाम निघाला. कवायत संपताच… प्रत्येकजण आपापल्या वर्गात पळतच सुटले आणि आपले आपले बेंच शोधू लागले….. हो शोधू लागले. कारण हे विद्यार्थी जवळपास 30 ते 40 वर्षानंतर आपल्या वर्गात घुसले होते. आणि विद्यार्थ्यांचे वय अगदी 28 वर्षे ते 58 वर्षे होते. प्रत्येकाचे चेहरे उजळून निघाले होते, प्रत्येकजण भारावून गेला होता आणि त्या बालपणीच्या आठवणीत रमून गेला होता. प्रत्येक जुन्या मित्र आणि मैत्रिणीला शोधत प्रत्येकजण सेल्फी पॉईंट वर फोटो काढत होता.

कार्यक्रमानंतर जुन्या मित्र-मैत्रिणींना निरोप देताना प्रत्येकाला गहिवरुन आले. डबडबत्या डोळ्याने आणि हुंदक्याने दाटलेल्या स्वराने, पण पुन्हा आणि नेहमी भेटण्याचे आश्वासनही देत होता सर्वांनी निरोप घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या 1990 च्या बॅचचे बाळासाहेब पाटोळे आणि इतर सर्व बॅचचे माजी विद्यार्थी कमिटी मेम्बर्सनी केले. कार्यक्रमानंर सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना शाळेचे स्मृतिचिन्ह देण्यात आले.