उस्मानाबाद प्रतिनिधी | किशोर माळी
शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह अकरा जणांवर 307 प्रमाणे खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सोलापूर जिल्ह्यातील अकलूज पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. खासदार ओमराजे, त्यांचे नातेवाईक हिम्मत पाटील, रवी पाटील यांच्यासह अन्य 8 अनोळखी आरोपींचा यामध्ये समावेश आहे.
काल तुळजापूरचे भाजप आमदार राणा पाटील यांच्यासह इतरांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाल्यावर आज खासदार ओमराजेवर गुन्हा नोंद झाला आहे. यानिमित्ताने उस्मानाबाद जिल्ह्यात पाटील व राजेनिंबाळकर सत्ता संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे.
कळंब पंचायत समिती सभापती निवडीवरून मारहाण केल्याची तक्रार उस्मानाबाद जिल्हा बँकेचे संचालक सतीश दंडनाईक यांनी दिल्यानंतर हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दंडनाईक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 29 डिसेंबर रोजी ते स्वतः, गणेश भातलवंडे व गाडी चालक पोपट चव्हाण हे मिळून रात्री 8.30 वाजता अकलूज येथे गेले. कळंब पंचायत समिती सदस्य हिम्मतराव पाटील यांच्या घरी असल्याची खात्री करण्यासाठी गेलो असता 3 पंचायत समिती सदस्य देण्याची विनंती केली, हे सदस्य स्वखुशीने आलेत की बळजबरीने याची खात्री करायची असे सांगितल्यावर हिम्मतराव पाटील यांनी दंडनाईक यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर जीव वाचविण्यासाठी मी पळालो असता माझा 1 किमी पाठलाग करून मला पकडले व घरात आणून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. हिम्मतराव पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना फोन लावला व सांगितले की मी यांना पकडले आहे त्यावर ओमराजे फोनवर म्हणाले की, त्यांना सोडू नका त्यांना धडा शिकवा असे मी फोन स्पीकरवर ऐकले आहे. त्यानंतर पाटील यांनी सत्ततूर डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला व भातलवंडे आणि चव्हाण यांनाही पकडून मारहाण केली. हिम्मतराव पाटील यांनी त्यानंतर आम्हाला अकलूज पोलिसांच्या ताब्यात दिले माझ्या पायाला व हाताला मुक्कामार लागला आहे. मी घाबरल्याने फिर्याद दिली नव्हती मात्र माजी मानसिक स्तिथी ठीक झाल्याने व भीती कमी झाल्याने अटकेत असताना तक्रार देत आहे .
कळंब पंचायत समिती सभापती निवडीवरून सत्तासंघर्ष सुरू असून आज होणाऱ्या निवडीकडे लक्ष लागले आहे.