दरवर्षी अक्षयतृतियेला श्रीगणेशाला आंब्यांचा नैवेद्य दाखवला जातो. अक्षयतृतियेच्या दिवशी या सोनेरी-तांबूस रंगाच्या रसरशीत फळाला श्रीगणेशांच्या चरणी वाहिले जाण्याचा मान दिला जातो. पुण्यातील ’देसाई बंधू आंबेवाले’ हे आंब्यांचे अग्रेसर व्यापारी ११,००० आंब्यांचा भरघोस नैवेद्य श्रीगणेशांच्या चरणी अर्पण करतात. मंदिराचा परिसर पिकलेल्या, सोनेरी रंगाच्या आंब्यांनी भरून गेलेला असतो आणि त्या आंब्यांचा मंद सुवास कानाकोपऱ्यात भरून रहातो. मंदिराला भेट देणारे भक्त आणि माध्यमांचे कर्मचारी हे अद्भुत् दृश्य बघायला आणि आपल्या कॅमेऱ्यांमधे बंदिस्त करायला मोठ्या संख्येने हजर असतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंदिरात येणाऱ्या भक्तांना हजारो आंबे वाटले जातात.