संजू सॅमसनचं आदर्शवत पाऊल, सामन्याचं मानधन केले दान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था | तिरुअनंतरपुरमच्या ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय मैदानावर नुकतीच भारत अ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अ संघांमध्ये ५ वन-डे सामन्यांची मालिका पार पडली. सामन्यात पावसाचा व्यत्यय आणि खराब खेळपट्टी यामुळे प्रत्येक सामना हा ५० षटकांऐजी २० ते २५ षटकांचा खेळवण्यात आला. खेळपट्टी खेळण्यालायक बनवण्यासाठी मैदानातील कर्मचाऱ्यांना बरीच मेहनतही घ्यावी लागली. भारताने ही मालिका ४-१ ने जिंकली. अखेरच्या सामन्यात भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने आक्रमक अर्धशतकी खेळी केली. संजू सॅमसनने ४८ चेंडूत ९१ धावा तडकावल्या. या खेळीनंतर संजू सॅमसनला सामनावीराचा किताबही देण्यात आला.

मात्र या खेळीनंतर संजूने एक आदर्शवत पाऊल टाकत सर्वांची मन जिंकली. अखेरच्या दोन सामन्यांसाठी मिळालेलं मानधन संजूने मैदानातील कर्मचाऱ्यांना दान दिलं आहे. संजूला अखेरचे दोन सामने खेळण्यासाठी दिड लाखांचं मानधन मिळालं. “ही मालिका व्यवस्थित पार पडली यासाठी मैदानातील कर्मचाऱ्यांना श्रेय मिळायलाच हवं. जर खेळपट्टीमध्ये जरासाही ओल राहिला असता तर सामनाधिकाऱ्यांनी खेळ होऊच दिला नसता. यासाठी मैदानातील कर्मचाऱ्यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. याचसाठी मी माझं मानधन मैदानातील कर्मचाऱ्यांना देण्याचं ठरवलं आहे.” संजूने आपली भावना व्यक्त केली.