मुंबई : संपावर गेलेल्या कर्मचार्यांच्या वेतनात कपात करण्याचे आदेश एस.टी. महामंडळाने दिले आहेत. ८ आणि ९ जून रोजी महामंडळाने केलेली पगारवाढ पुरेशी नसल्याची तक्रार करत एस.टी. कर्मचारी संपावर गेले होते. आता या संपावर गेलेल्या कर्मचार्यांच्या पगारात कपात करण्याचे आदेश महामंडळाने दिले असल्याने एस.टी. कर्मचार्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
कोणतीही पुर्वकल्पना न देता संपावर गेलेल्या आणि कामावर गैरजहर राहीलेल्या एस.टी. कर्मचार्यांच्या वेतनात कपात करण्याचे अादेश एस.टी. महामंडळाचे महाव्यवस्थापक माधव काळे यांनी विभागीय नियंत्रकांना दिले आहेत. एक दिवस संपावर गेलेल्या कर्मचार्यांचा नऊ दिवसांचा पगार कापण्याचा अादेश महामंडळाने दिला आहे तर दोन दिवस संपावर गेलेल्यांचा दहा दिवसांचा पगार कापण्याचा आदेश देण्यात आला आहे.
महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी महामंडळाचा वेतन कपातीचा निर्णय अन्यायकारक असल्याचे म्हणले आहे. निर्णय मागे घेण्यासंदर्भात आम्ही प्रशासनाला लेखी आवाहन करणार आहोत असेही शिंदे यांनी सांगीतले आहे. वेतन कपातीचा निर्णय महामंडळाने मागे न घेतल्यास न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही यावेळी शिंदे यांनी दिला आहे.