टीम, HELLO महाराष्ट्र : तमिळनाडूमधील सरकारी शाळेत शिकवणारे एक शिक्षक सध्या सोशलमिडीयावर चांगलेच चर्चेत आले आहेत. विद्यार्थ्यांनी मागून – पुढून गच्च मिठ्ठी मारलेला त्यांचा फोटो समाजमाध्यमांवर वायरल झाला आहे. “सर, तुम्ही जाऊ नका..”, असे म्हणत विद्यर्थ्यांनी शाळेतून बदली झालेल्या त्यांच्या सरांना भावनिक आळ घातला आहे. फोटोमधे शाळेतील विद्यार्थी ओक्साबोक्सी रडताना दिसत आहेत. तर विद्यार्थ्यांनी गच्च मिठी मारलेले त्यांचे सरही भावनिक झाले असल्याचे दिसत आहे.
तमिळनाडूमधील वेलीआगरम या गावामधे हा प्रकार घडला आहे. तेथील सरकारी शाळेमधे जी. भगवान हा २८ वर्षांचा तरुण गेली चार वर्ष शिक्षक म्हणुन काम करत आहे. इंग्रजी विषय शिकवणारे जी. भगवान हे विद्यार्थ्यांमधे भलतेच प्रिय आहेत. नोकरीच्या या चारच वर्षांत त्यांनी विद्यार्थ्यांसोबत खूप चांगले बाँडींग बनवले आहे. सर्वच विद्यार्थ्यांना हवेहवेसे वाटणार्या त्यांच्या ह्या आवडत्या शिक्षकाची दुसर्या गावी बदली झाली असल्याची बातमी वेलीआगरमवासीयांना कळाली आणि गावामधे एकच शोककळा पसरली.
तमिळनाडुमधे शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील प्रमाण योग्य ठेवण्याच्या हेतूने ज्या शाळेत शिक्षकांचे प्रमाण विद्यार्थ्यांच्या प्रमाणाहून कमी आहे अशा शाळांमधे अतिरिक्त जादाचे शिक्षक असलेल्या शाळांतील जुनिअर शिक्षकांना पाठवले जाते. याच कारणावरुन जी. भगवान यांची तिरुत्तानी या वेलीआगरम जवळच्या गावातील सरकारी शाळेत बदली करण्यात आली आहे. परंतु विद्यार्थ्यांचा त्यांच्या प्रिय शिक्षकासोबतचा हा फोटो समाजमाध्यमात वायरल होऊन बदली करणार्या अधिकार्यांकडे पोहोचला आणि सरकारी अधिकार्यांनाही गहिवरुन अाले. भगवान याची बदली करणार्या सरकारी अधिकार्यांनी समाजमाध्यमांवरचा वायरल फोटो पाहिल्यानंतर जी भगवान यांच्या बदलीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे ठरवले असल्याचे समजत आहे.
आजच्या डिजिटल जगातसुद्धा गुरु-शिश्याचे हे नाते असे इतके घट्ट असू शकते हे या घटनेने दाखवून दिले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी सांगणे, त्यांचे वेगवेगळे खेळ घेणे, प्रत्तेक विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती नीट समजाऊन घेऊन त्याला त्यानुसार समजाऊन घेणे आदी गोष्टींमुळे जी भगवान त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत एक वेगळे नाते बनवण्यात यशस्वी झाले असल्याचे बोलले जात आहे. जी भगवान हे वर्गांमधे प्रोजेक्टरच्या सहाय्याने शिकवत असल्याने विद्यार्थ्यांमधे त्यांची एक वेगळी छबी निर्मान झाली होती.
गावकर्यांनी आणि विद्यर्थ्यांनी भगवान सरांची बदली रोखण्याकरता केलेल्या अथक प्रयत्नांनतर शेवटी प्रशासनालाही बदलीच्या निर्णयावर पुनर्विचार करावा लागला आहे.