सांगली महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे

महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी सत्ताधारी भाजप कडून मिरजेचे गणेश माळी व कुपवाडचे गजानन मगदूम यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे आता सभापतीपदाचा निर्णय बुधवारी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपच्या या घडामोडीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी नजर ठेवली आहे. नाराजीचा फायदा उठविण्याच्या तयारीत आघाडीचे नेते आहेत.

महापालिकेच्या स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती व समाजकल्याण समितीच्या सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सभापतीपदासाठी गुरुवारी अर्ज दाखल होणार आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्या स्थायी समिती सभापतीपदाचा मान सांगलीला मिळाला होता. त्यामुळे आता मिरज किंवा कुपवाडला संधी मिळणार आहे.

या पदासाठी मिरजेतून गणेश माळी व कुपवाड मधून गजानन मगदूम यांची नावे चर्चेत येत आहेत.मात्र सांगली विधानसभा क्षेत्रात सभापतीपद रहावे यासाठी भाजप नेते शेखर इनामदार यांनी गजानन मगदूम यांच्यासाठी आग्रह केला आहे. यामुळे या वादात नेत्यांचे सभापतीपदी संधीवर एकमत होईना. बुधवारी कोअर कमिटीची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत सभापतीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.

Leave a Comment