भारतीय सेनेत रुजू असलेले युवराज पाटील यांनी “फेसाटी” या साहित्य अकादमी विजेत्या कादंबरिवर लिहीलेले पुस्तक परिक्षण गोरेंच्या लेखणीचा वेध घेणारे आहे. थेट जम्मु-काश्मिर मधून युवराज यांनी फेसाटी कादंबरीवर परीक्षण लिहीले आहे.
साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा यावर्षीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार लेखक नवनाथ गोरे यांच्या “फेसाटी” या आत्मकथनपर कादंबरीस जाहीर झाला आहे. धनगर समाजात जन्मलेल्या नवनाथ गोरे यांचे मुळ गाव सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधे निगडी खुर्द हे आहे. गोरे यांनी त्यांना आजवरील आयुष्यात आलेल्या अनुभावांतून फेसाटी या कादंबरीचे लेखन केले आहे. शेळ्या – मेंढ्या पाळणे हा पारंपारिक व्यवसाय असलेल्या गोरे यांनी अतीशय हलाखीतून स्वत:चे शिक्षण पुर्ण केले आहे. सध्या नवनाथ गोरे शिवाजी विद्यापिठ, कोल्हपुर येथे मराठीचे प्राध्यापक म्हणुन कार्यरत आहेत.
“अडचणींंचा डोंगर पार करतानाची फेसाटी”
पुस्तकाचे नाव – फेसाटी
लेखक – नवनाथ गोरे
एखाद्या माणसाच्या आयुष्यात अडचणींचा डोंगर असावा तरी किती मोठा. जो चढुन पार करता करता त्या माणसाचे बालपण, किशोरवय, तरुणपण कायमच दुःखाच्या अंधारात गडुप व्हावे. तिथं सुखःचा प्रकाश अभावानेच पडावा. कुटुंबाची होणारी ससेहोलपट न थांबणारी, वरुन संकटांचा हल्यावर हल्ला. यातुन मार्ग काढता काढता दमगीर होणाऱ्या अस्वस्थ नायकाचे जीवनविश्व ढवळुन काढणारी आणि वाचणा-याला गलबलुन सोडणारी, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेतुन आणि प्रकाशिका प्रियंका प्रशांत पटवर्धन यांच्या प्रकाशन संस्थेकडुन प्रकाशित झालेली मित्र नवनाथ गोरे यांची पहिलीच आत्मकथन पर कादंबरी म्हणजे “फेसाटी”.
बारमाही भणभणता दुष्काळ असलेल्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील चार मुली आणि दोन मुलं त्यामधील एक मुलगा जन्मताच अपंग अशी कौंटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या अल्पभुधारक आणि निसर्गाच्या वक्रदृष्टीने बेजार झालेल्या कुटुंबाच्या जगण्याच्या संघर्षाने फेसाटीच्या “सुंबरानाला” सुरवात होते. कुटुंबकबिला मोठा अशात अर्थिक परिस्थिती बेताची, मिळकतीचे दरवाजे मर्यादित, जे उघडे ते निसर्गाच्या भरवशावर, शेळ्या मेंढ्यावर आणि रोजंदारीच्या मिळकतीवर कुटुंबाची गुजराण. खाणारी तोंड जास्त आणि कमावणारं हात कमी. वाताहत ठरलेली. त्यातुनही लेखकाचे वडील मार्ग काढत कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. लेखक स्वतः कादंबरी मधुन स्वतःचं करुणादायी बालपण मांडत आहे. घरात घडणाऱ्या प्रत्येक हालाकीच्या प्रसंगाचं वर्णन करत आहे. दुष्काळामुळं रोजगाराची वाणवा, घरचं अठराविश्व दारीद्र, घरप्रमुखाची उपासमार, वारंवार होणारी कुटुंबाची उपासमार, होरपळत असलेलं लेखकाचं बालपण वाचणारा अस्वस्थ होतोय. जेवढी जमिन आहे त्यातही भावबंदकी आडवी येते. चलतचित्रासाखी कादंबरी प्रवाहीत होणारी आहे, दिवस अन दिवसाच्या दुखाचा मागोवा कादंबरीतुन समोर येतोय. गरीबीची स्वप्नं किती मर्यादित असतात याच मन सुन्न करणारं वर्णन समोर येतं. रक्ताच्या नात्याकडून होणारी फसवणूक, परिस्थिती चा फायदा उठवु पाहणारे माजोर धनदांडगे ठळकपणे दिसतात. शिक्षणाची गंगा दारोदारी पोहचली तरी भटकंती करणाऱ्या समाजाची मुलं अजुनही कोसोदुर असल्याचं पहायला मिळतय. प्रसंगी जातीय अपशब्द वापरुन सुशिक्षित पांढरपेशीकडुन अवहेलना झालेली वाचायला मिळते. या अवहेलनेला प्रत्युंतर म्हणुन लेखक महापुरुषांचे उदाहण देत आहे लेखकाने पहिली पासुन ते पदवीधर पर्यतच्या शाळेतील घटनांची तपशील वार मांडणी “फेसाटी” मधुन मांडली आहे. बालपण अन्नान्न दशेमध्ये गेल्यानंतर खातं पितं वयही अपवाद राहीलेलं नाही, फेकुन दिलेल्या केळीची सालं पोटाची भुक भागवण्यासाठी खाल्यालं वाचताना न कळत डोळ्यांच्या कडा ओलावत्यात. शाळेमधील घटना वाचताना ते दिवस जगलेल्या वाचकांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याशिवाय राहत नाही. सबंध कादंबरीत जत आणि परिसरातील बोली भाषेचा गोडवा जाणवतो. लहानपणापासून लेखकाला कावीळ मुतखड्यासाख्या दुखण्यांनी पिडलेलं आहे. पोटाला पिळ पडेपर्यत अंगावर ताप कणकणी घेत रोजगार असा लेखकाचा प्रवास चाललेला आहे.
सणसुद म्हणजे लेखक आणि कुटुंबाला संकटच वाटत आलेले आहेत. शेजारच्या घरात तव्यावर भाजणा-या खमंग पुरणपोळीचा वास पसरल्यावर लेखकाच्या घरात भाकरीसाठीची परवड पहायला मिळते.लेखकाने शाळा शिकावी म्हणून लागेल ती मदत आई वडील करण्यास तयार आहेत पण लेखकाला शाळेत रस वाटत नाही. कधी शाळेतील गुरुजींचा मार खाल्यावर, कधी अंगावरील फाटकी कपडे बघितल्यावर लेखकाला शाळाच शिकु नये असं वाटतय.रोजगार करत करत लेखक शाळा शिकतोय. आल्या प्रसंगाला धोरोदात्तपणे तोंड देताना सबंध कादंबरीतुन दिसतोय. शाळेपासुन अलिप्त राहु पाहणाऱ्या लेखकाच्या जीवनाला आशादायी कलाटणी मिळण्यास कारण ठरलेले दोन मित्र म्हणजे विष्णू माने आणि बापु टोणे. ईथुन लेखकाचा शाळेचा प्रवास ख-या अर्थाने सुरु होताना दिसतोय. लेखक स्वतःचे अवगुण जे सर्वामध्ये कमी जास्त प्रमाणात आढळतात ते स्पष्टपणे मांडण्याच धाडस करताना दिसतोय हे विशेष आहे. त्यामुळं कादंबरीला जीवंतपणा आला आहे. सावकारी कर्ज, आगीच्या हवाली झालेलं झोपडीवजा घर,जळून काळंकुट्ट पडलेलं धान्य, पोटापाण्याची झालेली आबाळ, तारुण्यसुलभ वयात जीवनात आलेली आणि नंतर दुरावलेली जया, शिकवणी दरम्यान मित्रांकडून झालेली मदत, जीवनात आलेले कटु गोड प्रसंग लेखकाने ओघवते व्यक्त केले आहेत. भाषामाध्यम, रुपबंध असाच असावा आणि ईत्यादी बाबींच्या चौकटीत न अडकता मुक्तपणे पुर्वायुष्य शब्दबद्ध करीत मनातील घुसमटीला मोकळी वाट करुन दिली आहे. निसर्गताच आलेली बोलीभाषा वाचकाला आपली वाटते प्रसंगाचे गांभीर्य समजण्यास मदत होते. कादंबरी वाचकाचा ताबा घेते. सुरवातीला शाळा म्हणजे बंदीवास वाटणारा लेखक आज पदवीधर आहे हे उल्लेखनीय आहे.
आदरणीय लेखक मित्र नवनाथ गोरे यांना पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
युवराज कुंडलिक पाटील, सांगली
मोबाईल – ९५९५७३०४०८
मेल – [email protected]