सीमेवरील शत्रूचा सामना आपण करूच, पण या जातीयवादी शत्रूचा सामना कोण करणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आजच्या तरुणाईपुढे बेरोजगारीच तर प्रमुख आव्हान आहेच त्याबरोबरच अजून एका गंभीर समस्येच आव्हान आहे. ते आव्हान म्हणजे ‘जात’. ऑनर किलिंगची घटना घडल्यावरच हे आव्हान प्रकर्षाने समोर येतं. जुन्या पिढीने जपलेली जातीव्यवस्थेची बंधनं नव्या पिढीला तोडायची आहेत. ही बंधनं तोडताना जातीय मानसिकतेशी संघर्ष करावा लागणार आहे. हा संघर्ष करण्याचं धाडस माझ्या पिढीतील प्रत्येक जण दाखवेलच असं नाही. काही अपवाद वगळता आजची तरुणाई उदार विचाराची आहे. जातीय मानसिकता या तरुणाईच्या मनात नाही. बदलती आर्थिक परिस्थिती देखील यास कारणीभूत आहे. सामान्यतः मैत्री करताना, इतर व्यवहार करताना कधीच हे जातीच बंधन आडवं येत नाही. मात्र जेव्हा आजच्या तरुणाईवर लग्न करण्याची वेळ येते तेव्हा मात्र ही जात तोंड वर काढायला लागते. जुन्या पिढीने जातीला जपत, जातीय दहशतीखाली, जातीतल्या जातीत लग्न केली आणि ही जातिव्यवस्था बळकट केली. आजच्या पिढीला मात्र जातीच्या या चौकटीतून मुक्त व्हायचंय. आजचा तरुण किंवा तरुणी जात बघून आपल्या जोडीदाराची निवड करत नाही. बदलत्या काळामुळे आजच्या तरुणाईवर जातीय संस्कार देखील झालेले नाहीत. त्यामुळे आजच्या तरुणाईमध्ये ‘जात’ या गोष्टीविषयी विशेष प्रेम नाही, उलट माणसा माणसात भेदभाव करणाऱ्या या जातीविषयी चीड आहे. समाज हा सकारात्मक बदलाचा स्वीकार करत पुढे जातो. पूर्वी असणारा जातीव्यवस्थेचा प्रभाव आता कमी झालेला दिसुन येतो. त्यामुळे जात तोडण्याची हिंमत करण्यास सभोवतालीच वातावरण बऱ्यापैकी अनुकूल झालं आहे. अशा अनुकूल वातावरणात वाढत असणारी तरुणाई आपला जोडीदार निवडताना जातीचा विचार सहसा करत नाही. मग अनेक तरुण तरुणी ही जातीयतेच्या चौकट मोडून आंतरजातीय लग्न करतात. हे लग्न करताना जातीय दहशतवादाचा त्यांना सामना करावा लागतो. कधी कधी या बदलू पाहणाऱ्या तरुणाईला जातीय मानसिकतेच शिकार व्हावं लागतं. सैराट चित्रपटात शेवटी आरची आणि परश्याचा केलेला खून हा इथल्याच जातीयव्यवस्थेने केलेला खून आहे.

मराठा जातीत, एका गरीब कुटुंबात जन्मलेली मुलगी शिक्षण घेऊन मोठी होतेय. स्वतःच्या पायावर उभी राहतेय. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतेय. आणि इथल्या नीच जातिव्यवस्थेची बंधनं झुगारून एका वंजारी जातीतील मुलाला आपला जोडीदार म्हणून निवडते. या सर्व प्रक्रियेत तिची काय चूक? शिक्षणाने ती शहाणी झालीय, बंडखोर झालीय. तिला इथली जातीयव्यवस्था मान्य नाही. महात्मा फुले, आंबेडकर यांसारख्या समाजसुधारकांनी जातीयव्यवस्थेविरुद्ध केलेला संघर्ष तिने वाचलाय. तिला ही जातिचं बंधन तोडून लग्न करायचंय. मात्र हे करत असताना तिला पहिल्यांदा घरच्यांच्या जातीय मानसिकतेचा सामना करावा लागतो. जातीयग्रस्त समाज काय म्हणेल या दहशतीखाली घरचे या लग्नाला नकार देतात. प्रिय असणाऱ्या जोडीदारासोबत जावं की जातीय समाजाच्या दहशतीला बळी पडणाऱ्या प्रिय कुटुंबासोबत जावं हा पेच तिच्यासमोर उभा राहतो. ही घालमेल आजची तरुणाई अनुभवत आहे. कुटुंबाने साथ दिली तर हा जातीयव्यवस्थेविरुद्धचा संघर्ष सोप्पा होतो. मात्र दुर्देवाने कुटुंबाने साथ दिली नाही तर जातीय दहशतवादाचा सामना हा ठरलेलाच.

समाज, देश सीमेवरच्या दहशतवादाचा सामना करण्यास नेहमी सज्ज असतो. पण या जातीय दहशतवादाचा सामना कोण करणार? मी याला जातीय दहशतवाद म्हणतो कारण या जातीय मानसिकतेने बदलू पाहणाऱ्या आजच्या तरुणाईचे बळी घेतले आहेत. आंतरजातीय लग्न केलं म्हणून बापच मुलीचा खून करतोय. कोणत्या बापाला स्वतःच्या मुलीचा खून करू वाटेल? जातीय दहशतीखाली,  बहिष्काराच्या भीतीपोटी तो आपल्या प्रिय मुलीचा खून करतो. जातीय मानसिकतेने अशा अनेक लोकांचे खून केले आहेत.

मी वरी लिहिताना प्रातिनिधिक उदाहरण म्हणून मराठा जातीतील मुलीच आणि वंजारी जातीतील मुलाच उदाहरण दिलं आहे. जातीय मानसिकता मला विचारेल तुम्ही मराठा जातीतल्या मुलीच किंवा वंजारी जातीतल्या मुलाचच का उदाहरण दिलं? इतर जातीत तुम्हाला जातीय मानसिकता दिसत नाही का? लग्न हा जातीव्यवस्थेचा एक अँगल झाला. असे अनेक अँगल या समाजव्यवस्थेने जोपासलेले आहेत. दैनंदिन प्रथांमध्येही जातीय मानसिकता दिसून येते.

आजच्या तरुणाईने हे जातीय बंधन झुगारून बदलाला साथ द्यावी अशी अपेक्षा आहे. पण अनेकजण या जातीय मानसिकतेला बळी पडताना दिसत आहेत. बदल म्हणला की संघर्ष हा ठरलेलाच. त्या काळी महात्मा फुल्यांनी दलित बांधवांसाठी स्वतःच्या घरचा हौद पाणी पिण्यासाठी खुला केला. हे मोठं क्रांतिकारक पाऊल होतं. आपल्याला उठता बसता शाहू, फुले, आंबेडकर असा वारसा सांगायचाय, मात्र त्यांच्या पाऊलावर पाऊल मात्र ठेवायचे नाही. हा करंटेपणा निदान आजच्या तरुणाईने तरी करू नये. काळ पुढे जाईल तसा हा जातीय व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष अजूनच तीव्र होत जाणार आहे. आजच्या तरुणाईने या जातीय दहशतवादाचा सामना करण्यास वेळीच सज्ज व्हावं.

– मयुर डुमणे