औरंगाबाद प्रतिनिधी | आजपर्यंत आपण विविध क्षेत्रात होणारे अनेक विक्रम ऐकले व वाचले असतीलच. राजकारण हे सुद्धा अनेक विक्रमांची नोंद होणार क्षेत्र. परंतु आजवर निवडणूक निकाल आणि कोण किती मतांनी निवडून आले इतक्या पर्यंतच हे विक्रम मर्यादित होते. मात्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या नावे एक वेगळाच राजकीय विक्रम नोंदवला गेला आहे.
नियमानुसार राजकीय पक्षातील नेत्यांना पक्षांतर व इतर निवडणुकीसाठी राजीनामा द्यावा लागतो. याच कारणामुळे गेल्या पाच महिन्यांपासून राज्यात ३० आमदारांनी पक्षांतर व इतर कारणासाठी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या प्रमाणावर राजीनामे स्वीकारण्याचा विक्रम विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या नावावर नोंदविला गेला आहे.
त्यातच विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने हरिभाऊ बागडे हे देखील आपल्या फुलंब्री मतदारसंघात तळ ठोकून होते. त्यामुळे राजीनामा देण्यासाठी आमदार किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांना वाड्या, तांडे, वस्त्या पालथ्या घालाव्या लागल्या होत्या. विशेष म्हणजे मेलवर आलेला राजीनामा देखील विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडून स्वीकारला गेला. विधानसभेतील कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापासून सुरू झालेला राजीनामा स्वीकारण्याचा सिलसिला आज नितेश राणे यांनी दिलेल्या राजीनाम्यावर येऊन थांबला आहे. तेव्हा विधानसभा अध्यक्ष म्हणून हरिभाऊ बागडे यांच्या नावे राजीनामा स्वीकारण्याचा नोंदवलेला विक्रम भविष्यात कोणी मोडीत काढेल का असा गमतीशीर सवाल उपस्थित होत आहे.