10 आणि 500 ​​रुपयांच्या नव्या नोटा येणार; RBI ची माहिती

10 AND 500 rupees notes
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय चलनातील 10 आणि 500 ​​रुपयांच्या नोटेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 10 आणि 500 ​​रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार आहेत. या नवीन नोटांची रचना महात्मा गांधी (नवीन) सिरीज मधील आधीच जारी केलेल्या ₹ 10 आणि ₹ 500 च्या नोटांसारखी असेल. त्यांच्या डिझाइनमध्ये किंवा सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही. मात्र त्यावर सही मात्र आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांची असेल. याबाबत माहिती देताना आरबीआयने हे सुद्धा स्पष्ट केलं आहे कि, जरी 10 आणि 500 ​​रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या तरी जुन्या नोटांचे महत्व अजिबात कमी होणार नाही. 10 आणि 500 रुपयांच्या जुन्या नोटा सुद्धा चलनात कायम राहतील, त्यामुळे नागरिकांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही.

यापूर्वी गेल्या महिन्यातही आरबीआयने १०० आणि २०० रुपयांच्या नोटा चलनात आणण्याची घोषणा केली होती, ज्यावर गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी स्वाक्षरी केली होती. संजय मल्होत्रा ​​यांनी डिसेंबर २०२४ मध्ये आरबीआय गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी शक्तीकांत दास यांची जागा घेतली, ज्यांचा कार्यकाळ मुदतवाढीनंतर संपला. संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) हे 1990 च्या बॅचे आणि राजस्थान केडरचे सनदी अधिकारी आहेत. त्यांनी कानपूरमधून कंप्यूटर विज्ञान मध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळवली आहे. याशिवाय त्यांनी अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातून सार्वजनिक धोरणात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. संजय मल्होत्रा ​​यांनी ऊर्जा, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान, खाणी इत्यादींसह विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे. अर्थ मंत्रालयात सचिव (महसूल) म्हणून काम पाहिलं आहे.

दरम्यान, 7 एप्रिलपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक सुरू होत आहे. आरबीआयचे गव्हर्नर 9 एप्रिलला रेपो रेट जाहीर करतील. चालू आर्थिक वर्षातील ही पहिली बैठक असणार आहे. त्यामुळं ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, या बैठकीत रेपो दरात 0.25 टक्के कपात केली जाऊ शकते. असे झाल्यास रेपो दरात सलग दुसऱ्यांदा कपात केली जाईल.