हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या “लाडकी बहीण” (Ladaki Bahin Yojana) योजनेतील लाभार्थींची तपासणी आता आणखीन कडक करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या संख्येने महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता. मात्र निवडणूक संपल्यानंतर राज्य सरकारने लाभार्थ्यांची तपासणी सुरू केली आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत तब्बल ५ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. आता आणखीन १० लाख महिला अपात्र ठरणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांच्या आर्थिक स्थितीची पाहणी करण्यासाठी एक सर्वेक्षण मोहीम राबवली आहे. विशेष म्हणजे, घरात चारचाकी वाहन असलेल्या महिलांना देखील योजनेतून वगळण्याचा आले आहे. तर दीड लाख महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेतले आहेत. तर अधिकृत छाननीनंतर ५ लाख महिलांना योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आता पुढील काही आठवड्यांत १० लाख महिलांना योजनेतून वगळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, चारचाकी वाहन निकष लागू केल्यानंतर आता राज्य सरकार लाभार्थी महिलांच्या आर्थिक स्थितीबाबत अधिक तपशीलवार पडताळणी करत आहे. त्यासाठी प्राप्तिकर विभागाकडून लाभार्थ्यांची आर्थिक माहिती मागवण्यात आली आहे. विशेषतः मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये किती महिला अपात्र ठरतात, याबाबतचा अहवाल लवकरच समोर येणार आहे. परिणामी पुन्हा एकदा अनेक महिला या योजनेतून वगळल्या जाणार आहेत.




