कराड | हजारमाची (ता. कराड) येथे शनिवारी मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेला पायथा नावाचा ढाबा बंद करण्यास सांगितल्याच्या कारणावरून जमावाने पोलिसांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी दहाजणांवर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे.
या प्रकरणात किरण दीपक जाधव (वय ३०), प्रकाश रामकृष्ण खोड (३५), कांता बसप्पा कुडी (३०), महेश निवासराव शिंदे (३४, सर्व रा. ओगलेवाडी, ता. कराड), अक्षय राजेंद्र पवार (२८, रा. गुरूवार पेठ, कराड), विकी अनिल चोथे (२८, रा. बनवडी), दत्तात्रय कृष्णा पवार (४९, रा. कराड), बजरंग श्रीरंग पवार (४१), सुरेश मधुकर चव्हाण (३१, रा. मलकापूर), भिकाजी दिनकर माने (३५, रा. ओगलेवाडी) अशी पोलिनसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी प्रताप मोहिते व गृहरक्षक दलाचे जवान निकम हे शनिवारी रात्री गस्त घालीत होते. त्यावेळी हजारमाची गावच्या हद्दीत असणारा हॉटेल पायथा ढाबा हा रात्री दीड वाजेपर्यंत सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी संबंधित ढाब्यावर जावून ढाबा बंद करण्यास सांगीतले. मात्र, त्यांचे न ऐकता युवकांनी त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कराड शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दहाजणांवर गुन्हा दाखल केला. तसेच संशयितांना अटक केले. याबाबतची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.