हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| जागतिक महिला दिनाच्या (International Women’s Day) पूर्वसंध्येला राज्य सरकारने महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आता मुलींच्या शिक्षणासाठी संपूर्ण शुल्क माफ केले जाणार असल्याची घोषणा केली आहे. यापूर्वी राज्य सरकारने (State Government) मुलींच्या शिक्षणामध्ये ५०% शुल्क सवलत दिली होती. मात्र आता उर्वरित रक्कमही सरकार उचलणार असल्याने मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग अधिक मोकळा झाला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती देत सांगितले की, “महिलांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्याच्या दिशेने हा मोठा टप्पा आहे. शिक्षणामुळे महिलांना अधिक संधी उपलब्ध होतील, त्यामुळे समाजाच्या सर्वांगीण विकासालाही गती मिळेल.” देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या घोषणेमुळे राज्यातील विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक मुली आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. खास करून, ग्रामीण भागातील आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे त्यांच्यासाठी शिक्षणाची दारे अधिक खुली झाली आहेत. आता मुलींच्या शिक्षणावरील आर्थिक बोजा कमी झाल्यामुळे पालकांनाही या निर्णयाचे स्वागत केले आहे.