अमरावती प्रतिनिधी । देशातील आणि राज्यातील दिवसेंदिवस वाढणारे कर्करोगाचे प्रमाण लक्षात घेत अमरावती जिल्हा आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय असंसर्ग रोग नियंत्रण मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेतील तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत संशयित कर्करुग्णांची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत १०८ बाधित रुग्ण आढळून आले असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात १ एप्रिल ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान विविध उपक्रमांच्या माध्यमातून रुग्ण तपासणी करण्यात आली होती. ३० वर्षांवरील मनुष्यांची इन्युमिरेशन रजिस्टरमध्ये आशा व सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या हस्ते नोंदणी, तसेच मधुमेही, उच्च रक्तदाब, तोंडाचा कॅन्सर, स्तनाचा, गर्भाशय मुख कर्करोगाबाबत प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे.
या तपासणीमध्ये १३७७ महिला व १५४३ पुरुष असे एकूण २ हजार ९२० मधुमेही आढळून आले. तर ३३४३ महिला व २९४७ पुरुष असे एकूण ६ हजार ३१७ उच्च रक्तदाबाचे रुग्ण आढळून आलेत. तसेच दोन्ही आजार १५३५ रुग्णांमध्ये आढळले आहेत. मुख कर्करोग १० महिला व २८ पुरुषांमध्ये आढळला. ६१ महिलांना स्तनाचा, तर नऊ महिलांना गर्भाशय मुखाचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर किमोसह विविध उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.