शहरात वाढणार 11 नगरसेवक; प्रभागांचीही होणार पुनर्रचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असतानाच राज्य शासनाने बुधवारी शहराची वाढलेली लोकसंख्या गृहीत धरून नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे औरंगाबाद महापालिकेत आता 11 सदस्य वाढणार आहेत. यापूर्वी असलेल्या 115 वरून सदस्यांची संख्या 126 वर पोचणार आहे तर प्रभागांची संख्या 41 होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सदस्य संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

निवडणूक आयोगाने महापालिकेला पत्र देत प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याची सूचना केली. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी त्यासाठी समिती स्थापन केली आहे. प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू असतानाच बुधवारी राज्य सरकारने आणखी एक निर्णय घेत सदस्यांच्या संख्येत 17 टक्के एवढी वाढ केली आहे. शहराची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 12 लाख 28 हजार 32 एवढी आहे. 2021 मध्ये जनगणना अपेक्षित होती; पण कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे जनगणनेचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे वाढलेल्या लोकसंख्येचा अंदाज गृहीत धरून महापालिकेच्या निर्वाचित सदस्य संख्येमध्ये वाढ केली जाणार आहे.

औरंगाबाद महापालिकेची सदस्य संख्या सातारा-देवळाईच्या समावेशानंतर 115 एवढी झाली होती. त्यात अनुसूचित जाती 22, अनुसूचित जमाती दोन, नागरिकांचा मागासवर्ग 31, नागरिकांचा खुला प्रवर्ग 60 याप्रमाणे आरक्षण होते. आता सदस्य संख्या 11 ने वाढणार असून, ती 126 एवढी होणार आहे. शहराची लोकसंख्या 12 लाख ते 14 लाख दरम्यान असल्यामुळे त्या मर्यादेतच सदस्य संख्या ठेवली जाणार आहे. सदस्य वाढणार असल्याने प्रभागाची संख्या 38 वरून आता 41 वर जाणार आहे. नगरसेवकांच्या संख्येत वाढ होणार असल्यामुळे नव्याने प्रभाग रचना आणि वॉर्डांच्या सीमारेषा निश्चित कराव्या लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

निवडणूक पडणार लांबणीवर
महापालिकेची निवडणूक आगामी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता आणखी दोन महिने निवडणूक लांबणीवर पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अशी वाढली नगरसेवक संख्या –
वर्ष नगरसेवकांची संख्या
1988 – 60
1995 – 83
2000 – 85
2005 – 99
2010 – 99
2015 – 115

Leave a Comment